जळगांव जिल्हाक्राईम

२५.४२ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश L C B आणि भुसावळ पोलिसांची मोठी कामगिरी!

फिर्यादीचाच ड्रायव्हर ठरला मुख्य सूत्रधार; सहा आरोपी अटकेत, २३.४२ लाख रुपये रोख आणि तीन मोबाईल जप्त

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १ नोव्हेंबर २०२५ :भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांच्या दरोड्याचा गुन्हा अवघ्या ४८ तासांत स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ पोलिसांनी उकलून काढत सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २३ लाख ४२ हजार रुपयांची रोकड आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्यामागचा सूत्रधार फिर्यादीचाच ड्रायव्हर असल्याचे तपासात उघड झाले असून, या जलद कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.

घटनेचा तपशील असा की, फिर्यादी मोहम्मद यासीन इस्माईल हे ‘रॉयल कंपनी’त कार्यरत असून, २८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कंपनीतील २५.४२ लाख रुपयांची रोकड घेऊन मोटारसायकलवरून घरी जात होते. खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला धडक देत तोल जाऊन पडलेल्या फिर्यादीकडून पैशांची बॅग हिसकावून घेत पळ काढला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्हा नोंदविला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयाचा काटा फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग इब्राहिम बेग (२५, रा. भुसावळ) याच्याकडे वळला. चौकशीत त्यानेच या गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली. त्याने आपल्या साथीदारांना पैशांच्या ने-आण वेळेची माहिती देऊन ‘टिप’ दिली होती.

तपासात पुढे उघड झाले की, शाहीद बेगने अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे पैसे असल्याची माहिती मुजाहीद आसीफ मलीक (२०) आणि मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (१९) या दोघांना दिली. यानंतर या दोघांनी हा प्लॅन अजहर फरीद मलक (२४), अमीर खान यूनुस खान (२४) आणि इंजहार बेग इरफान बेग (२३) – हे रावेर तालुक्यातील रसलपूर येथील रहिवासी – यांना सांगितला. गुन्ह्याच्या रात्री या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन फिर्यादीकडून बॅग हिसकावून नेली.

आरोपींकडून २३ लाख ४२ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली असून, उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. याशिवाय, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपींना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, तपासात उघडकीस आले की आरोपींपैकी काहींवर पूर्वीचे गुन्हेही दाखल आहेत. मुख्य सूत्रधार शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यांत केबल चोरीचे गुन्हे, तर अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

या कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका), राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ) आणि राहुल गायकवाड (स्था. गु. शा. जळगाव) यांच्या पथकाने कसून तपास करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला.

या कारवाईत पो.उपनिरीक्षक रवी नरवडे, हवालदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रेमचंद सपकाळे, श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, पुजा अंधारे, संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, जितू ठाकरे, योगेश माळी, भूषण चौधरी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, प्रमोद पाटील आदींचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button