₹४२.६० कोटींचा महाघोटाळा उघड; अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
रस्ते डांबरीकरण कामात फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) दि. २ मे – शहरात तब्बल ₹४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले असून मुंबईस्थित अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड विरोधात फसवणूक व विश्वासघाताचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १२७/२०२६ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४०९ व ४२० अंतर्गत शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी रात्री नोंदविण्यात आला.
दरम्यान याबाबत नगरसेवक अरविंद देशमुख यांनी पाठपुरावा करून हा घोटाळा उघडकीस आणला असून याप्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आज शासनाकडून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी म्हणून जळगाव महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता योगेश प्रकाश बोरोले (वय ४६) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, अटलांटा कंपनीचे संचालक राजू अंबालाल वावरोट व संबंधित अधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचा विश्वास संपादन करून शहरातील रस्त्यांचे पेवर मशिनद्वारे डांबरीकरण करण्याचा ठेका मिळवला होता.
मात्र, कंपनीने ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण केले नाही. तसेच मोबिलायझेशन निधी, मूळ रक्कम, व्याज, दंड आणि महानगरपालिकेला करावा लागलेला अतिरिक्त खर्च यांचा एकत्रित परिणाम म्हणून महानगरपालिकेला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ही कथित अनियमितता सन १९९७ ते २००६ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. त्या वेळी ही योजना तत्कालीन नगरपरिषदेकडे होती. त्यामुळे या प्रकरणात त्या काळातील प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या घोटाळ्यात नेमके कोण-कोण सहभागी आहेत, कोणत्या पातळीवर निर्णय झाले आणि निधीचा गैरवापर कशा प्रकारे झाला, याचा सखोल तपास सुरू आहे.
दरम्यान, या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे शहरातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






