जळगांव जिल्हाक्राईम

 “आई, हा माझा तुला शेवटचा कॉल…! प्रेमप्रकरणातून १९ वर्षीय युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

आईशी सुरू असलेल्या कॉलदरम्यानच धावत्या रेल्वेखाली झोकून दिले; मोबाईल रेकॉर्डिंगमुळे घटनेचा धक्कादायक उलगडा

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. १५ मे – जळगाव शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आघडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. प्रेमप्रकरणातून तणावात असलेल्या १९ वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली असून, मृत युवकाचे नाव गणेश कोळी असे आहे.

या घटनेची विशेष बाब म्हणजे आत्महत्या करताना गणेशचा त्याच्या आईसोबत फोन कॉल सुरूच होता आणि संपूर्ण संवाद मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही ४ मे पासून घरातून निघून गेले होते, याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी दोघेही जळगाव रेल्वे स्थानकावर परत आले होते. त्यानंतर दोघांनीही आपल्या नातेवाईकांना आपण जळगावला आल्याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरुणीला तिच्या नातेवाईकांनी घरी नेले, मात्र गणेशने आईशी संपर्क साधला.

घटनेच्या काही वेळ आधी गणेशने इंस्टाग्रामवर तरुणीसोबतचा फोटो शेअर करून “माय वाईफ माय जान” असे स्टेटस ठेवले होते. आईशी शेवटच्या संभाषणात तो भावनिक झाला होता. “आई, मी मोठी चूक केली आहे, हा माझा तुला शेवटचा फोन कॉल आहे,” असे तो बोलल्याचे समोर आले आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्याने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपले जीवन संपवले.

या संपूर्ण घटनेदरम्यान त्याचा मोबाईल कॉल सुरूच राहिल्याने नंतर रेल्वे पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असता तो कॉल सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या बाजूला त्याची आई अजूनही फोनवर बोलत असल्याचे समजताच पोलिसांनाही धक्का बसला.

दरम्यान, या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून मृताच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी दबाव टाकून शिवीगाळ केली तसेच कुटुंबाला संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच दबावामुळे गणेशने आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकरणी नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी चौकशीचे आश्वासन दिले असून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button