५३ तासांच्या अखंड संगीत सोहळ्याने केला जागतिक विक्रम; ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स इंग्लंडमध्ये नाव
११५ गायकांनी ५७५ मराठी आणि हिंदी गाणी केली सादर ; जळगावच्या डॉ.मसूद शेख यांचाही सहभाग

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ३१ ऑक्टोंबर : पुणे प्रतिनिधी – संगीत आणि कलाविश्वात महाराष्ट्राने पुन्हा एकदा विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वामिनी म्युझिक अँड डान्स अकादमी, वारजे (पुणे) यांच्या संकल्पनेतून दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता सुरू झालेला अखंड संगीत सोहळा तब्बल ५३ तास सुरू राहून दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता संपन्न झाला. या विक्रमी कराओके ऑर्केस्ट्रा महोत्सवात ११५ गायकांनी मिळून ५७५ मराठी आणि हिंदी गाणी सादर करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स इंग्लंड’च्या विक्रमात आपले नाव कोरले आहे.
या भव्य कार्यक्रमाचे आयोजन व्ही.पी. स्टुडिओ, पाटील प्लाझा, स्वारगेट (पुणे) येथे करण्यात आले होते. या संगीतमहोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ६ वर्षांच्या लहान बालिकांपासून ते ७२ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील गायकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थी, व्यावसायिक, गृहिणी, सेवानिवृत्त अधिकारी आणि हौशी कलाकार यांनी आपल्या गाण्यांद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या विक्रमी कार्यक्रमाची नोंद अधिकृतपणे ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स – इंग्लंड’ यांनी घेतली असून, लवकरच सर्व सहभागी गायकांना प्रमाणपत्र आणि पदक देण्यात येणार आहे.
या कलाकारांमध्ये जळगावचे डॉ. मसूद एम. शेख (Ph.D. & N.D.), सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, यांनी देखील सहभाग घेत हिंदीतील पाच गाणी सादर केली. त्यांच्या सहभागाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशामागे स्वामिनी म्युझिक अँड डान्स अकादमीच्या संचालिका, सुप्रसिद्ध गायिका आणि मराठी अभिनेत्री पुष्पा चौधरी यांची कल्पक संकल्पना, तसेच व्ही.पी. स्टुडिओचे संचालक विवेक पांडे व त्यांच्या टीमचे अथक परिश्रम आणि तांत्रिक सहकार्य हे घटक कारणीभूत ठरले.
या रेकॉर्ड ब्रेकिंग सोहळ्यामुळे महाराष्ट्राचे नाव जागतिक संगीत क्षेत्रात झळकले असून, पुणेकरांचा आणि सहभागी कलाकारांचा गौरव वाढला आहे.





