जळगाव दि.२० मे २०२४ : २०२४ हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे सार्थ त्रीशती वर्ष आहे. याच प्रसंगाचे औचित्य साधून दि. २६ जून ते २९ जून २०२४ दरम्यान जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणावरती विश्वातील पहिले श्री. शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. शिवचरित्र सकारात्मक रीतीने पुढील पिढीस हस्तांतरित करावे या उद्देशाने इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याबाबतची सविस्तर माहिती सोमवारी दि. २० मे रोजी पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली.
पत्रकार परिषदेत संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य डॉ. लक्ष्मण देशमुख, नियंत्रक पाचोरा येथील रवींद्र पाटील,इतिहास प्रबोधन संस्था सचिव स्वाती साठे, प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा. सुनील गरुड,प्रा.देशमुख आदी उपस्थित होते.शिवप्रभूंचे चरित्र साहित्य संमेलन म्हणजे नवतरुण आणि भविष्यातील पिढीला सकारात्मक दृष्टीने पुण्य पुरुषाच्या चरित्राचे अवलोकन व्हावे हाच एकमेव उद्देश या संमेलनाचा आहे. या संमेलनास बारा मावळ प्रांतातील नद्या आणि गडदेवता येणार आहेतच. शिवाय शिवनेरीची नाती आणि रायगडाची माती पण येणार आहे. संमेलनाच्या निमीत्ताने शिवरायांच्या स्वराज्य विषयीचा दृष्टीकोन म्हणजे बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार म्हणजेच मराठ मावळा हा संमेलनास सामील व्हावा हा उद्देश आहे.
जळगावात होणाऱ्या या विश्वस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक सातारा गादीचे छत्रपती श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे असणार आहेत, तसेच या संमेलनाचे अध्यक्ष शककर्ते शिवराय या विश्वप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुख नागपूर हे असणार आहेत. या संमेलनास कोल्हापूर चे छत्रपती संभाजी महाराज, तंजावरच्या वारस श्रीमंत शिवाजी राजे भोसले आणि नागपूर गादीचे वारस श्रीमंत मुधोजी राजे भोसले हे उपस्थित असणार आहेत.
सुभेदार तानाजी बाबा मालुसरे, यसाजी कंक, बाजीप्रभु देशपांडे, मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज संमेलनात दाखल होणार असून, विश्वातील सर्वात मोठे नाणे संग्राहक किशोर चंडक सोलापूर, तुळजाभवानी शस्त्र प्रशिक्षण संस्था पुणे यांचे शत्रप्रदर्शन, तीनशे मराठयांच्या समाधीचे चित्ररुपी प्रदर्शन घेऊन इतिहासाचे अभ्यासक प्रवीण भोसले सांगली येथून येणार आहेत. तसेच संकेत गांगूर्डे यांचे पगडी प्रदर्शन आणि संतोष आवटी जालना यांचे चित्र प्रदर्शन आणि स तिश दुधाने यांचे वीरगळ प्रदर्शन तसेच महेश पवार यांचे आरमार प्रदर्शन सादर होणार आहे.
या संमेलनात दिनांक २६ जुन रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ कार्यक्रम सादर करणारे राजाराम बापू कदम समूह परभणी यांचा गोंधळ जागरण कार्यक्रम होणारं असुन दिनांक २७ तारखेला शिवरायावरील पहिला पोवाडा लिहिणारे शाहीर अज्ञानदास यांचे वंशज हरिदास शिंदे अहिल्यादेवी नगर हे लोप पावत चाललेल्या शिवकाळातील कला हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर २८ जुन रोजी शाहीर प्रसाद विभुते सांगली यांचा पोवाडा गायन कार्यक्रम सादर होणार आहे. प्रस्तुत संमेलनास शिवपूर्वकालातील संत साहित्य आणि शिवोत्तर काळातील संत साहित्य या विषयावर परिसंवाद होणार आहे तसेच शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची गरज त्याची उपलब्धता होईल या विषयावर देखील एक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त संख्येने या संमेलनात सामील व्हावे असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य लक्ष्मण देशमुख आणि या संमेलनाचे नियंत्रक रवींद्र पाटील पाचोरा, इतिहास प्रबोधन संस्थेच्या सचिव भारती साठे यावल यांनी केलेआहे.