जळगांव जिल्हाशैक्षणिक

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ९ फेब्रुवारी २०२६ : फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत जिल्ह्यात बारावीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत ८२ केंद्रांवर तर दहावीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत १४७ केंद्रांवर होणार असल्याची माहिती देण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी ५९ हजार ४२० तर बारावीच्या परीक्षेसाठी ४८ हजार २३२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवरील मूलभूत सुविधा बीओ केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी तपासून घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले.सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात आली असून ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे तत्काळ बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवणे, ५० मीटर परिसरात अनधिकृत प्रवेशास मनाई, तसेच विद्यार्थ्यांची फ्रिस्किंग प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे आदेश देण्यात आले.

संवेदनशील केंद्रांवर बैठी व फिरती पथके, ड्रोन कॅमेरे व व्हिडिओग्राफीद्वारे विशेष लक्ष ठेवले जाणार असून मोबाईलच्या गैरवापरास प्रतिबंध करण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर मालप्रॅक्टिसेस कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीत परीक्षा केंद्रांवरील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थापन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, सुरक्षा व निरीक्षण यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. भरारी पथक व तपासणी पथकांचे प्रभावी नियोजन, विविध विभागांमध्ये समन्वय साधून विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना निर्भय, शांत व अनुकूल वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्ह्याभरात झूम ॲपद्वारे नियंत्रण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक वर्गामध्ये झूमद्वारे व्हिडिओ चित्रीकरण होईल. याचे नियंत्रण तालुकास्तरावर एक समिती तसेच जिल्हास्तरासाठी देखील एक समिती तयार करण्यात आली आहे, जी पेपर सुरू होण्यापासून संपेपर्यंत लक्ष ठेवेल.

सर्व संबंधित अधिकारी व विभागांना आवश्यक दिशानिर्देश देत काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. निष्पक्ष, पारदर्शक व गुणवत्ताधिष्ठित परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button