व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून ६ लाखांचा गंडा; जळगावात ‘सेक्सटोर्शन’चा धक्कादायक प्रकार
विवस्त्र व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तोतया सायबर पोलीस अधिकाऱ्यानेही उकळले पैसे

लोकमाध्यम न्युज | प्रतिनिधी : सोशल मीडियावरील मोह आणि अनावधानाने उचललेला एक व्हिडिओ कॉल एका १९ वर्षीय विद्यार्थ्याला तब्बल ६ लाखांना पडला आहे. विवस्त्र व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत सायबर भामट्यांनी या विद्यार्थ्याकडून ५ लाख ९५ हजार ४५० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ५ मार्च रोजी अज्ञात महिला आणि तोतया पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेला तरुण मूळचा चाळीसगाव येथील रहिवासी असून तो नाशिक येथे बीसीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. ५ सप्टेंबर २०२५ रोजी फेसबुकवर सर्फिंग करत असताना त्याला ‘ऑनलाईन मुलींशी बोलण्यासाठी लिंकवर क्लिक करा’ असा संदेश दिसला. त्या लिंकवर क्लिक करताच एक ॲप उघडले गेले. काही वेळातच एका अनोळखी क्रमांकावरून त्याला व्हिडिओ कॉल आला. कॉल स्वीकारताच समोर एक महिला विवस्त्र अवस्थेत अश्लील कृत्ये करताना दिसली. त्या महिलेच्या जाळ्यात अडकून विद्यार्थ्यानेही अंगावरील कपडे काढले. सुमारे दहा मिनिटे हा संवाद सुरू राहिला, मात्र समोरून वारंवार तेच शब्द येत असल्याने विद्यार्थ्याला संशय आला आणि त्याने कॉल कट केला.
व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
कॉल कट होताच समोरच्या व्यक्तीने विद्यार्थ्याचा विवस्त्र व्हिडिओ त्यालाच व्हॉट्सअॅपवर पाठवला. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत तो डिलीट करण्यासाठी ‘डिलीट कार्ड’ घेण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यात आली. घाबरलेल्या विद्यार्थ्याने सुरुवातीला काही रक्कम पाठवली. मात्र, भामट्यांची हाव वाढतच गेली.
तोतया पोलीस अधिकाऱ्याची एन्ट्री
याच काळात विद्यार्थ्याला दिल्ली सायबर पोलिसांतून बोलत असल्याचे सांगून ‘राम पांडे’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. “तुमच्याविरुद्ध अश्लील व्हिडिओ कॉल केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे, गुन्हा दाखल करायचा नसेल तर पैसे द्यावे लागतील,” अशी धमकी या तोतया अधिकाऱ्याने दिली. भीतीपोटी विद्यार्थ्याने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून वेळोवेळी एकूण ५ लाख ९५ हजार ४५० रुपये सायबर गुन्हेगारांना पाठवले.
हा प्रकार ५ सप्टेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या प्रदीर्घ कालावधीत सुरू होता. वडिलांच्या खात्यातून मोठी रक्कम गेल्याचे आणि ब्लॅकमेलिंग थांबत नसल्याचे लक्षात आल्यावर विद्यार्थ्याने घरच्यांना आपबिती सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ जळगाव सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.





