
कामाच्या संथगतीबद्दल नाराजी व्यक्त करत थेट ‘लाइव्ह डेमो’चे आदेश
| लोकमाध्यम News | जळगाव : महानगरपालिकेत बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर) वॉटर मीटरच्या कामकाजासंदर्भात महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरात वॉटर मीटर बसवणाऱ्या कंपनीच्या संथ आणि मनमानी कारभारावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
जळगाव शहरात वॉटर मीटर बसवण्याचा मक्ता ‘खिल्लारी सॉफ्टवेअर टेक्निकल, मुंबई’ या कंपनीला देण्यात आला आहे. मात्र, या कामकाजाची माहिती वेळोवेळी महापालिकेला पुरवणे अपेक्षित असताना ती देण्यात आलेली नाही. तसेच कंपनीने महापालिकेशी कुठलाही समन्वय ठेवलेला नाही, याबाबत महापौरांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
शहरात बसवण्यात आलेल्या वॉटर मीटरमधून पाणी गळती होत असल्याच्या आणि पाण्याचा फोर्स (दाब) कमी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याशिवाय, वॉटर मीटरची नेमकी कार्यपद्धती काय आहे, याबाबत अद्यापही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना किंवा महापालिकेला कोणतीही माहिती दिलेली नाही, हा मुद्दा बैठकीत गांभीर्याने चर्चेला आला.
वॉटर मीटर बसवण्याचे कामकाज अतिशय कासवगतीने आणि संथ गतिने सुरू असल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदारांच्या या सुस्त कारभारावर ताशेरे ओढत महापौरांनी वॉटर मीटरचा ‘लाइव्ह डेमो’ (प्रत्यक्ष कार्यप्रणाली करून दाखवणे) देण्याचे सक्त आदेश दिले. तसेच, आतापर्यंत जळगाव शहरात नेमकी किती वॉटर मीटर बसवण्यात आली आहेत, याची अधिकृत आकडेवारी तात्काळ सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे अभियंता घृष्णेश्वर साळुंखे, खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ठेकेदार मृत्युंजय सिंग, प्रकल्प सल्लागार लोमेश भोळे, साईट इंजिनिअर राकेश पाटील, गौरव गोरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.





