जळगावमहापालिका

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करू — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शहराच्या विकासासाठी अधिक निधी मिळवण्यासाठी संयुक्त पाठपुरावा

मध्यवर्ती कचरा संकलन व हस्तांतरण केंद्रासह आधुनिक अग्निशमन दुचाकीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

| लोकमाध्यम News | जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, त्यानुसार नागरिकांना स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे आणि अग्निसुरक्षेच्या अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, शहराचा विकास केवळ जिल्हा नियोजन समितीच्या निधीपुरता मर्यादित न ठेवता शासनाकडूनही अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे संयुक्तपणे पाठपुरावा करू आणि अधिक निधीसाठी साकडे घालू. जळगाव स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येची गांभीर्याने दखल घेत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे सूचनाही दिल्या .

जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत जुन्या टी. बी. सॅनिटोरियम परिसरात उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती कचरा संकलन व हस्तांतरण केंद्राचे (ट्रान्सफर स्टेशन) तसेच आधुनिक अग्निशमन दुचाकीचे लोकार्पण गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे यांच्यासह लोकप्रतिनिधी, नगरसेवक व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील मूलभूत सुविधांच्या कामांना गती द्या — पालकमंत्रीशहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. विमानतळ ते अजिंठा चौफुलीदरम्यान सौर पथदिव्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत ही कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करून नियमित देखभाल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अंगणवाडी इमारतींसह नागरिकांच्या गरजेनुसार व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. अरुंद गल्लीबोळांतील आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक अग्निशमन दुचाकी उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद करत त्यांनी कचरा संकलन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाच्या दर्जेदार उभारणीबद्दल पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आदित्य (भा.प्र.से.) जिवने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपस्थितांच्या आग्रहास्तव पालकमंत्र्यांनी आधुनिक अग्निशमन दुचाकी स्वतः चालवून पाहिली.

आधुनिक सुविधांमुळे कचरा व्यवस्थापनाला गती

या मध्यवर्ती केंद्रात शहरातील घंटागाड्यांद्वारे संकलित होणारा कचरा एकत्रित करून गार्बेज कॉम्पॅक्टरच्या साहाय्याने संकुचित करून पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र रॅम्प, गार्बेज कॉम्पॅक्टर, वजनकाटा, कचऱ्यातून झिरपणाऱ्या दूषित पाण्याच्या व्यवस्थापनाची सुविधा आणि सर्व ऋतूंमध्ये वापरता येणारे आच्छादित शेड उपलब्ध आहे. यामुळे घंटागाड्यांचा वेळ वाचून कचरा संकलन व वाहतूक अधिक जलद, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम होणार असून शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे.

स्वच्छता व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल — महापौर दिपमाला काळे

महापौर दिपमाला काळे यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत उभारण्यात आलेले मध्यवर्ती कचरा संकलन केंद्र शहराच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. आधुनिक अग्निशमन दुचाकीमुळे अरुंद गल्लीबोळांमध्येही आगीच्या घटनास्थळी तातडीने मदत पोहोचविणे शक्य होईल. तसेच केंद्रातील बंदिस्त व्यवस्थेमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करूया — आ. राजूमामा भोळे

आमदार राजूमामा भोळे यांनी नागरिकांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत जळगाव स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे नमूद करत महापालिका प्रशासनानेही आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे सांगितले. शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रेल्वे स्थानक परिसर कचरामुक्त करा — खा. स्मिता वाघ

खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत हा परिसर कचरामुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बायपास परिसरातील अपघातांबाबत चिंता व्यक्त करत संबंधित यंत्रणांनी नियमित देखरेख व आवश्यक उपाययोजनांवर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महापालिका आयुक्त आदित्य जिवने ( भा. प्र. से )यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. शासनाकडून मिळालेल्या मंजुरीनंतर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील आधुनिक सुविधा, कचरा संकलन व हस्तांतरणाची कार्यपद्धती आणि त्याचा महापालिकेच्या दैनंदिन कामकाजाला होणारा उपयोग याबाबत त्यांनी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार सोनवणे यांनी केले तर आभारप्रदर्शन उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास नगरसेवक विष्णू भंगाळे, सुनील खडके, अरविंद देशमुख, गणेश सोनवणे, हर्षल मावळे, सागर सोनवणे, दिलीप पोकळे, पियुष कोल्हे, प्रकाश पाटील, वैशाली पाटील, नितीन सपके , नरेंद्र पाटील, अमर जैन, चेतन शिरसाळे, निलेश तायडे यांच्यासह कुंदन काळे,गजानन देशमुख, राहुल पाटील, आशुतोष पाटील, सुरेश कापसे, विजय जगताप तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button