जळगाव दि.६ जुन २०२४ : शेतकऱ्याकडून सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजाराची मागणी करणारा पिंप्राळा येथील मंडळ अधिकारी आज रंगेहाथ सापडला. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवाईत सापडलेल्या संबंधित मंडळ अधिकाऱ्याच्या विरोधात जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण खंडू बाविस्कर (वय ४७) असे त्यांचे नाव आहे.
तक्रारदार हे सावखेडा गावातील मूळ राहिवाशी आहेत. सातबारा उताऱ्यावरून तक्रारदाराच्या वडिलांचे व आतेभावाचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी त्यांनी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयात काही दिवसांपूर्वी अर्ज सादर केला होता. त्यानंतर २० मे रोजी पिंप्राळा येथील तलाठी कार्यालयात जाऊन सदर प्रकरणाची चौकशी संबंधित तक्रारदाराने केली. मात्र, मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांनी तक्रारदाराकडे १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन दिलेल्या तक्रार अर्जानुसार पथकाने गुरूवारी (ता.०६) सापळा रचून मंडळ अधिकारी किरण बाविस्कर यास पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. संबंधित मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची माहिती मिळताच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. पिंप्राळा येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात यापूर्वी देखील अनेकांकडून विविध प्रकारचे दाखले तसेच कागदपत्रांसाठी पैसे मागण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.