लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.२१ जुलै २०२४ |
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात लवकरच आपली भुमिका जाहीर करणार आहेत. त्यानुसार प्रहार पक्षाकडून जळगाव जिल्ह्यात रावेर-यावल ,भुसावळ विधानसभा मतदार संघातून उमेदवारी लढवली जाणार आहे, तसेच जळगाव शहराचा देखील अभ्यास केला जाणार असल्याची माहिती पक्षाचे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी पद्मालय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटना प्रहार जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष दिनेश कोळी, महानगराध्यक्ष प्रविण पाटील, राजेंद्र कुंवर, महानगर महिला आघाडीच्या निता राणे, युवक तालुका अध्यक्ष सतीश सपकाळे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र सपकाळे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष निलेश सूर्यवंशी, पंकज पवार, अजय बनसोडे, ओम देशमुख, शुभम पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना संभाजी सोनवणे म्हणाले की, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पधाधिकाऱ्यांची नुकतेच संभाजीनगर येथे बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात तीन जागा लढवणार
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रहारची लढाई जागांवर नव्हे तर मुद्यांवर होणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेचे चित्र स्पष्ट झाल्यावर जळगाव जिल्ह्यातून किमान २ जागा लढवण्यात येणार आहे. त्यात रावेर-यावल, भुसावळ हे जवळपास निश्चित असून जळगाव शहराचा अभ्यास करून ठरवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी मेळावा, बुथ नियोजन, मतदार संघात भेटी सुरु करण्यात आल्या आहेत. रावेर-यावल मतदार संघातून प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी हे उमेदवार असणार आहेत तर भुसावळ आणि जळगावसाठी प्रभावी उमेदवाराचा शोध सुरू आहे.
९ ऑगस्ट क्रांती दिनी भव्य आंदोलन
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे क्रांती दिवस दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी संभाजीनगर येथे शेतकरी, दिव्यांग, महिला, तरुण, वृद्धांच्या विविध मागण्यांसाठी भव्य आंदोलन पुकारण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी असलेल्या आंदोलनाला दीड लाख समर्थकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे. आंदोलनानंतर पक्षप्रमुख आ.बच्चू कडू हे सर्वांना मार्गदर्शन करणार असून आपली भुमिका स्पष्ट करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संभाजी सोनवणे यांनी केले आहे.