महाराष्ट्रातील प्रवाशांची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली १४ ठार १६ जखमी : भाविक जळगाव जिल्ह्यातील?
लोकमाध्यम न्युज |जळगावदिनांक२३ऑगस्ट२०२४ |
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची एक बस उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून शुक्रवार दि.२३ ऑगस्ट रोजी दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत पडली. त्यात सुमारे ४० प्रवासी होते. अपघातात १४ भाविक मरण पावले असून त्यात एका बालकाचा समावेश आहे. १६ जण जखमी झाले असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, काही भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक यूपी.५३.एफटी.७६२३ ही नेपाळमधील पोखरा येथून काठमांडूला जात होती. बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवासी महाराष्ट्रातील होते. नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ११.३० वाजता हा अपघात झाला. एसपी बिरेंद्र शाही यांनी सांगितले की, बस मर्स्यांगडी अंबुखैरेनी नदीत पडली आहे. बचावकार्यात लष्कर आणि सशस्त्र दलांची मदत घेतली जात आहे.
गोरखपूरचे जिल्हाधिकारी कृष्णा करुणेश यांनी सांगितले की, बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची असून महाराष्ट्रातील भाविकांनी बस बुक केली होती. दोन बसमधून ११० प्रवाशी नेपाळला प्रयागराज, अयोध्यामार्गे जात होते. यातील एका बसला अपघात झाला आहे. दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुगलिंग येथे थांबले असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बसमधील भाविक जळगाव जिल्ह्यातील
दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील काही भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. यूपी आणि नेपाळ प्रशासनाशी संपर्क साधला असून १३ प्रवाशांना वाचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप पूर्ण माहिती प्राप्त झाली नसून काही वेळात संपूर्ण माहिती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नेपाळ अपघातातील प्रवाशांचा शेवटचा बस सोबत चा फोटो