चोपड्यातील खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा; आरोपी जेरबंद
रेल्वेतून पलायनाचा डाव फसला; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – चोपडा शहरात घडलेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पळून गेलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चालत्या रेल्वेतून शिताफीने ताब्यात घेतले.
दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री ९ ते २० एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान चोपडा-धरणगाव मार्गावरील पाटचारी परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणात संशयित चेतन सुभाष कानडे यांच्या सांगण्यावरून विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) यांनी संगनमताने प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून खून केल्याचे समोर आले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईपर्यंत पाठलाग, रेल्वेतच अटक
गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मुंबईत गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मुंबईकडे रवाना करण्यात आले. दरम्यान आरोपी रेल्वेने जळगावकडे परत येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाशिकहून रेल्वेत बसून शोधमोहीम राबवली. नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेतच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत उघडकीस आले कारण
अटक केल्यानंतर सुरुवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या सखोल चौकशीत पूर्वीच्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.
पोलीस पथकाची कारवाई
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या काम करत आरोपींना अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे जिल्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, विष्णू बिऱ्हाडे, सुनील दामोदरे, पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील तसेच चापोहेकॉ रिजवान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले आणि पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.






