शेळगाव बॅरेज परिसरातील अन्नपूर्णा मठातील जटाधारी साधूचे वाचवले प्राण
प्रशिक्षित आपदा मित्र व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जीवरक्षकांचे सहकार्य
लोकमाध्यम न्युज | जळगाव १९ ऑक्टोबर २०२४ |
जळगाव: शेळगाव बॅरेजसमोर असलेल्या प्राचीन महादेवाच्या मंदिराला पाण्याचा वेढा पडल्याने मंदिरातील अन्नपूर्णा मठात राहणारे साधू बाबा अडकले होते. त्यांना प्रशिक्षित आपदा मित्र व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या जीवरक्षकांनी रेस्कू करून सुखरूप वाचवले.
शेळगाव बॅरेजसमोरील टेकडीवर प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक वयस्कर साधू महाराज अनेक वर्षापासून सेवा देत आहेत. शेळगाव बॅरेज दरवाजे बंद झाल्यामुळे पाण्याचा साठा वाढला आणि मंदिराच्या चहू बाजूने पाण्याचा वेढा पडला. बाबांना येण्या-जाण्याचा रस्ता पाण्याने बंद झाल्याने त्यांच्यापर्यंत किराणा सामग्री पोहचवणे नागरिकांना शक्य झाले नाही. या साधू बाबांची व्यवस्था व्हावी म्हणून बाबांनी त्यांचे सहयोगी शिष्य सदाशिव सुतार यांना कळवले. सुतार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षित आपदा मित्र व वन्यजीव संरक्षण संस्थेचे जीवरक्षक जगदीश बैरागी यांना निरोप दिला.
वात्सल्य नेचर क्लब संस्थेचे किशोर पाटील, सदाशिव सुतार, वन्यजीव संरक्षण संस्थेचे जगदीश बैरागी यांनी शेळगाव बॅरेजला जाऊन पाहणी केली. याची माहिती जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांना दिली. महापालिकेचे अग्निशामक दलाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, देविदास सुरवाडे, वाहन चालक प्रदीप धनगर, संजय तायडे, मनोज तिरवड, चेतन सपकाळे, क्लीनर जगदीश साळुंके तसेच गावातील गावातील पट्टीचे पोहणारे महेंद्र भोई आणि सागर धनगर, राज कोळी, सरपंच कोळी यांच्या सहकार्याने आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांच्या मार्गदर्शनाने शनिवार, 19 रोजी मठातील साधु बाबाला दुपारी ठीक तीन वाजेच्या सुमारास रेस्क्यू करत वाचवले. त्यांना जळगावला पाठवण्यात आले आहे.