आई भवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी – जयश्रीताई महाजन
लोकमाध्यम न्युज | जळगांव ७ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी (दि.६) पिंप्राळा येथील भवानी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या समर्थकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
याप्रसंगी जयश्रीताई महाजन यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘आई भवानी आपल्या पाठीशी आहे, तिचा आशीर्वाद आणि मतदारांची साथ याने आपण जळगाव शहरात परिवर्तनाची लाट आणत शहराच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु करु. सद्यस्थितीत जळगावकर त्रासला आहे रस्त्यांना, महामार्गावर होणाऱ्या अपघातांना तसेच महत्वाच्या चौकात होणाऱ्या वाहन कोंडीला. शहराचा विकास करायचा म्हणजे नुसते रस्ते, गटारी बांधून होत नाही तर सर्वसामान्य माणसाचे उत्पन्न वाढण्यासोबत, औद्योगिक विकास होवून आपल्या शहरातील तरुणांना इथेच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझे विकासाचे व्हिजन मी आपल्यासमोर लवकरच मांडणार आहे. तुमच्या आशिर्वादाने व उत्स्फूर्त पाठिंब्याने माझा नव्हे तर आपला सर्व जळगावकरांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यामुळे आणि मांडलेल्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साह तसेच उपस्थितांमध्ये नवीन उर्मी दिसून आली.
जयश्रीताई महाजन यांनी प्रभाग क्रमांक १० च्या परिसरातील सेंट्रल बँक कॉलनी, आनंद मंगल कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंप्राळा गावठाण, मयूर कॉलनी, गणपती नगर, कुंभारवाडा, माऊली नगर या परिसरात प्रचार रॅलीदरम्यान परिसरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत, आपल्या मशाल चिन्हाला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले. संत मीराबाई नगर येथे प्रचार रॅलीचा समारोप झाला.