आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी मारल्या उड्या; समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने उडवल्याने १२ प्रवाशांचा मृत्यू

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ जानेवारी २०२५ |
प्रतिनिधी:- जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत असून पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला आग लागल्याची अफवा पसरल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी रेल्वेतून उड्या घेतल्या. मात्र दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली आल्याने यामध्ये १२ प्रवाशांची मृत्यू झाल्याची पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटना अतिशय दुर्देवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत परिस्थितीवर संपूर्ण लक्ष ठेऊन असल्याचे स्पष्ट केले आहे.
घटनेची माहिती देतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की कर्नाटक एक्सप्रेसने उडवल्याने १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी चार जणांचे मृतदेह पाचोरा येथे आहेत. तर आठ मृतदेह हे जळगावला पाठवण्यात आले आहेत. तसेच चार लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना वृंदावन या खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. ७ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
१२ जणांचे मृतदेह हाती
सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालात १२ जणांचे मृतदेह दाखल झाले. तर ५ जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेल्पलाईनवर सेवा उपलब्ध
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२५७-२२१७१९३ या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.





