
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २८ फेब्रुवारी २०२५ |
रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम शाळेत मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात आणि साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झाली. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला वंदन केले.कार्यक्रमास प्रसिद्ध टीव्ही कलाकार संदीप मेहता आणि कवी राजू बाविस्कर यांची उपस्थिती होती.
आपल्या प्रेरणादायी संवादातून संदीप मेहता यांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. मराठी साहित्य वाचनाची गोडी वाढवण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे संदीप मेहता यांचे संपूर्ण शिक्षण रोजलॅण्ड इंग्लिश मिडीयम शाळेतच झाले असून, त्यांना मराठी विषयाची गोडी लावणाऱ्या शिक्षिका स्व. एन. डी. पाटील मॅडम यांचा त्यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.त्यांच्या भाषणातील हा सर्वांत हृदयस्पर्शी क्षण होता, जेव्हा त्यांनी आपल्या मराठी शिक्षकांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, मराठीसाठी त्यांनी घडवलेली गोडी म्हणजे योग्य आणि प्रभावी शिक्षण ही त्यांना मिळालेली सर्वांत मोठी देणगी होती. स्व.एन. डी. पाटील मॅडम यांनी उत्कृष्ट मराठी शिकवली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज ते इतक्या मोठ्या मंचावर उभे आहेत. दुर्दैवाने, त्या शिक्षिका आज हयात नाहीत, परंतु त्यांचे योगदान अमूल्य आहे.

कवी राजू बाविस्कर यांनी आपल्या काव्यसंग्रहातील निवडक कविता सादर करून श्रोत्यांच्या मनावर गारूड केले. त्यांच्या प्रभावी काव्य सादरीकरणाने विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची अभिमानाची भावना निर्माण झाली.
विद्यार्थ्यांनीही आपल्या विविध सादरीकरणांमधून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मराठी कविता, गाणी, कथा वाचन, नाट्यछटा आणि लोककला यांचे सुंदर सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्तम सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे भरभरून कौतुक केले आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात “मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. ती जपली, तरच आपली ओळख कायम राहील,” असा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मराठी भाषा आणि संस्कृतीप्रती असलेली निष्ठा आणि अभिमान या सोहळ्यात प्रकर्षाने दिसून आला. मराठी भाषेचा उत्सव म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हता, तर ती एक भावनिक जडणघडण आणि प्रेरणादायी आठवण बनली.





