
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ३ मार्च २०२५ |
अहिल्या नगर:~ येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. महेश ढाके यांना “न्यायदीप विधिसम्राट” राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन संचालित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती यांच्या वतीने विधी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
न्याय, विधी, आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या विधिज्ञ, न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते आणि कायद्याच्या अभ्यासकांचा सन्मान करण्यासाठी हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. ॲड.महेश ढाके यांनी सिव्हिल, क्रिमिनल, ग्राहक संरक्षण आणि विविध कायदेशीर प्रकरणांत उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार नाशिक येथील रामलीला बँक्वेट हॉलमध्ये आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, पदक आणि सन्मानपत्र देऊन ॲड.महेश ढाके यांचा गौरव करण्यात आला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे होते. उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधीर तांबे, सचिन शिंपी (अध्यक्ष, नागपूर ग्राहक आयोग), माजी न्यायाधीश अशोक आव्हाड, डॉ. अविनाश झोटिंग (राष्ट्रीय सचिव), प्रा. डॉ. साहेबराव निकम (राष्ट्रीय प्रवक्ता), ॲड.प्रेरणा कुलकर्णी (माजी सदस्य, नाशिक ग्राहक आयोग), मनिष सानप (सहआयुक्त, अन्न प्रशासन, नाशिक), एस. एम. सांगळे (उपनियंत्रक, वजन मापे, नाशिक), महादेव मस्के (राज्य अध्यक्ष), संजय काळे (अध्यक्ष, सुकदेव एज्युकेशन सोसायटी) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, तसेच नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि ग्राहक जनजागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसुधारकांचा देखील “राष्ट्रीय पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला.
अँड. महेश ढाके यांचे अहिल्यानगर, संभाजीनगर, तसेच जळगाव जिल्ह्यातील वकील वर्ग, आप्तेष्ट आणि मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.