जळगांव दि.४ : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त रविवारी शहरात ठिक ठिकाणच्या मंदिरात पारायण, भक्तिगीत, भजने, पालखी परिक्रमा, कीर्तन, सत्संग पार पडले. यानिमित्त मिरवणुका, शोभायात्रा काढण्यात आल्या. पहाटे पासूनच संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या मूर्तीस पंचामृत महाभिषेक, महारुद्राभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाची सांगता झाली. आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने मंदिरे सजविण्यात आली होती. दर्शनाकरिता पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत लांबच लांब रांगा लावून भाविकांनी गर्दी केली होती. अनेक मंदिरात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात आला
जीवनमोती सोसायटीत भक्तिगीत गायन रंगले शिरसोली रोडवरील श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे सकाळी अकरा पुरोहितांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी ७.३० वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ७.३० वाजता महाआरती करण्यात आली. सायंकाळीं अरुण नेवे व सहकारी आणि रात्री विनोद बलदेवा यांचे गीतगायन व भक्तिगीत कार्यक्रमास उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिलांनी भजन व भक्ती गीतांवर ताल धरत नृत्य केले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.