रस्त्यावर उभ्या ट्रकचे डीझेल चोरी करणारा चोरटा अटकेत
सीसीटीव्ही वरून संशयिताला अटक ;एमआयडीसी पोलिसांची प्रभावी कारवाई

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २२ मार्च २०२५ |
शहरातील सम्राट कॉलनी परिसरात ट्रकच्या टाकीतून डीझेल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहनांमधून इंधन चोरीच्या घटना वाढल्याने वाहनचालक आणि ट्रान्सपोर्ट मालक हैराण झाले होते. अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेत त्याला गजाआड केले.
ट्रकच्या टाकीतील डीझेल गायब
१६ मार्च रोजी फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी यांनी त्यांचे दोन ट्रक वडेश्वर महादेव मंदिराजवळील रस्त्यावर पार्क केले होते. दोन्ही ट्रकच्या टाकीत १०० लिटर डीझेल भरलेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी चालक सैय्यद एजाज अकबर ट्रकजवळ आला असता, टाकीतील संपूर्ण डीझेल चोरीस गेल्याचे दिसले. यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही तपासातून मिळाले ठोस पुरावे
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, परिसरात अशा प्रकारच्या अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. परंतु वाहनचालकांनी किरकोळ नुकसान समजून तक्रारी दाखल केल्या नव्हत्या. यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. एका फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती मोटारसायकलवर येत ट्रकच्या टाकीचे झाकण उघडून नळीच्या सहाय्याने डीझेल काढत असल्याचे स्पष्ट दिसले.
यावल तालुक्यातून आरोपीला अटक
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील सचिन दगडू ठाकूर (वय २५) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १०० लिटर डीझेल हस्तगत केले.
वाहनचालकांना मोठा दिलासा, पोलिसांचे कौतुक
ही कारवाई यशस्वी झाल्यामुळे वाहनचालक व ट्रान्सपोर्ट मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वारंवार होणाऱ्या इंधन चोरीला आळा बसल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तसेच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





