जळगांव जिल्हाशैक्षणिकसामाजिक

प्लास्टिक प्रदूषणाचे समुळ उच्चाटन हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान ; जनजागृतीसाठी काम करू या : युवराज पाटील

लोकमाध्यम न्युज जळगाव दि : ६ जून २०२५
प्लास्टिक थैली व वस्तूंचा सर्रास वापर, पर्यावरणाचा ढासळलेला समतोल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे प्लास्टिक प्रदूषण हे देशासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. याचे समुळ उच्चाटन करणे आपल्याच हातात असून, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने प्लास्टिकविरोधी व्यापक चळवळ उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले.

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय जळगावतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिगरॅन्ड कंपनीचे समीर दाभाडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एन. व्ही. चव्हाण, गट निर्देशक डी. डी. देवरे, नितीन चौधरी आणि सी. व्ही. घोडके हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक विनोद ढगे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी नितीन पाटील यांनी केले.

१०० वृक्षांचे रोपण

पर्यावरण दिनानिमित्त लिगरॅन्ड कंपनीच्या सहकार्याने संस्थेच्या आवारात लिंब, पिंपळ, वड, चिंच आदी प्रकारच्या १०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.

पर्यावरण जागृतीसाठी स्पर्धा

या निमित्ताने आयोजित पर्यावरण जागरूकता विषयक वक्तृत्व स्पर्धेत धनश्री देवकर यांनी प्रथम क्रमांक, खुशबू मिस्त्री यांनी द्वितीय क्रमांक तर कोमल भावसार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

पथनाट्याद्वारे जनजागृती

केंद्रीय संचार ब्युरोच्या मान्यता प्राप्त ‘दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था’च्या पथनाट्यद्वारे पर्यावरण विषयक प्रभावी जनजागृती करण्यात आली. या पथनाट्यात विनोद ढगे (प्रमुख), सचिन महाजन, मोहीत पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, आकाश भावसार, सुदर्शन पाटील, दीपक महाजन, दर्शन गुजराती, अमोल ठाकुर आणि दिशा ढगे यांचा सहभाग होता.
जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. हिरवा झेंडा दाखवून मान्यवरांनी रॅलीला सुरुवात केली. फलक आणि घोषणांच्या माध्यमातून दोनशे विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रबंधक संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली किरणकुमार वर्मा, बापू पाटील यांच्यासह संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन किरणकुमार वर्मा यांनी केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button