स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याकरिता आत्मविश्वासासोबतच शिस्त आणि सातत्य गरजेचे : मिनल करनवाल

लोकमाध्यम न्युज जळगाव दि.१३ जून २०२५ : स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासासोबतच शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी केले. त्या आज शहरातील जी.एस. मैदानाजवळील विद्यानिकेतन शाळेत जिल्हा परिषदे तर्फे सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेत आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या.
या वेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. “फक्त यशस्वी उमेदवारांचे व्हिडीओ बघून अभ्यासाची पद्धत ठरवू नका. स्वतःच्या क्षमतेनुसार योग्य पद्धतीने अभ्यास करा. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
श्रीमती करनवाल पुढे म्हणाल्या की, “प्रत्येक परीक्षेसाठी एक निश्चित अभ्यासक्रम असतो. तो डोळ्यासमोर ठेवून मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा, सराव करा. सातत्याने सराव केल्यास आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेच्या वेळी मन:स्थिती स्थिर राहते. परीक्षेला जाताना योग्य मानसिकता अत्यंत महत्त्वाची आहे.
श्रीमती करनवाल यांनी विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षणाचे आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले. “मनात भीती असावी, पण त्या मेहनतीमध्ये अडथळा ठरू नये. यश-अपयशासाठी इतरांना दोष देण्याऐवजी आपली जबाबदारी स्वतः स्वीकारा. प्रत्येक व्यक्तीत यशस्वी होण्याची क्षमता असते, फक्त ती ओळखून योग्य दिशा आणि प्रयत्न आवश्यक असतात,” असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी ७ मुद्यांच्या आधारे स्पर्धा परीक्षेतील यशाचा प्रवास उलगडून दाखवला.
कार्यक्रमास अनेक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी शेअर करत मार्गदर्शन घेतले. उपस्थितांचे मनोबल वाढविणारे श्रीमती करनवाल यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.





