जळगावच्या राष्ट्रीय खेळाडूचा १५ ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा…!

राज्य सॉफ्टटेनिस असोसिएशन विरोधात पुण्यात आंदोलनाचा एल्गार
| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. १९ – गेल्या तीन वर्षांपासून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी शासन आणि क्रीडा प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने, जळगावचा राष्ट्रीय सॉफ्टटेनिस खेळाडू संदीप व्यवहारे यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे. ‘सॉफ्टटेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’च्या मनमानी आणि आडमुठ्या कारभारामुळे आपले क्रीडा प्रमाणपत्र रखडले असून, यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून येत्या १५ ऑगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात आत्मदहन करणार असल्याचा इशारा संदीप व्यवहारे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दीपक आर्डे , राहुल कुलकर्णी आणि खेळाडू उपस्थित होते.
अडीच वर्षांपासून शासनाशी लढा, तरीही नकार…
सॉफ्टटेनिस या खेळाचा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेल्या संदीपने राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी व्हावी यासाठी त्याने २ मे २०२४ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नाशिक विभाग यांच्याकडे अर्ज केला होता. तिथे दाद न मिळाल्याने त्याने २२ डिसेंबर २०२५ रोजी बालेवाडी, पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे प्रथम अपील सादर केले. मात्र, जोपर्यंत ‘सॉफ्टटेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तुमच्या स्पर्धेचा अधिकृत अहवाल सादर करत नाही, तोपर्यंत आम्ही प्रमाणपत्र पडताळणी देऊ शकत नाही, असे सांगत क्रीडा संचालनालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.
फेडरेशनचा अहवाल असूनही क्रीडा संचालनालयाची टाळाटाळ…
विशेष म्हणजे, ‘अमॅच्युअर सॉफ्टटेनिस फेडरेशन ऑफ इंडिया’ या राष्ट्रीय संघटनेने संबंधित स्पर्धेचा अहवाल बालेवाडी, पुणे येथील क्रीडा संचालनालयाला सादर केला आहे. राष्ट्रीय महासंघाचा अहवाल प्राप्त झालेला असतानाही, राज्य क्रीडा संचालनालय केवळ स्थानिक राज्य संघटनेच्याअहवालाचे कारण पुढे करत खेळाडूला डावलत आहे. या अन्यायाविरोधात संदीपने २ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथील ‘मानवाधिकार आयोगा’कडे तक्रार दाखल केली होती. मात्र, तिथेही राज्य संघटनेने अहवाल थांबवल्याचे कारण समोर आल्याने त्याचा अर्ज फेटाळला गेला.
लोकप्रतिनिधींचे प्रयत्नही निष्फळ; संघटना अध्यक्षांची मुजोरी..
या प्रकरणी संदीपने मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मीता वाघ यांच्याकडेही हे प्रकरण नेले. त्यांनी तात्काळ फोन करून दोन दिवसांत त्याची पडताळणी करा” अशा कडक सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांनीही त्यावेळी आश्वासन दिले होते, मात्र या घटनेला ६ महिने उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. खासदार रक्षा खडसे यांनीही फेडरेशन आणि क्रीडा विभागाशी संपर्क साधून खेळाडूचे नुकसान टाळण्याचे आवाहन केले होते, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.
संघटनेच्या अधिकाऱ्यांची टाळाटाळ…
सॉफ्टटेनिस असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे आणि सचिव रवींद्र सोनवणे यांच्याशी गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने संपर्क साधत आहे. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी आता खेळाडूचे फोन उचलणेही बंद केले आहे. शासनाने या संघटनेला डिसेंबर २०२५ आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये तब्बल तीन वेळा पत्रव्यवहार करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, तरीही संघटनेने अहवाल दिलेला नाही. या पदाधिकाऱ्यांना कोणाचा वरदहस्त आहे, याचा शोध शासनाने घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संदीपने केली आहे.
महाराष्ट्रातील १६ खेळाडूंचे भविष्य अंधारात…
हा अन्याय केवळ एकट्या संदीपवर झालेला नाही. सॉफ्टटेनिसच्या महाराष्ट्र संघात ८ मुले आणि ८ मुली अशा एकूण १६ खेळाडूंचा समावेश असतो. या संपूर्ण १६ जणांच्या चमूचा अहवाल ‘महाराष्ट्र सॉफ्टटेनिस असोसिएशन’ने शासनाला सादर केलेला नाही. यामध्ये जळगावसह पुणे, जालना, संभाजीनगर, धाराशीव आणि रायगड अशा संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंचा समावेश आहे. संघटनेच्या या अंतर्गत राजकारणामुळे आणि ढिसाळ कारभारामुळे या सर्व गुणवंत खेळाडूंचे भविष्य अंधारात सापडले आहे.
१५ ऑगस्टला पुण्यात आत्मदहन…
माझ्या आयुष्याचे आणि करिअरचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक खेळाडू या मानसिक त्रासातून जात आहेत. जर मला आणि माझ्या सहकारी खेळाडूंना न्याय मिळाला नाही, तर येत्या १५ ऑगस्ट रोजी बालेवाडी, पुणे येथे आत्मदहन करणार आहे.
— संदीप श्रीराम व्यवहारे ,राष्ट्रीय सॉफ्टटेनिस खेळाडू, जळगाव.






