ताज्या बातम्याजळगांव जिल्हामहाराष्ट्र

मोठी बातमी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला !

पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींची निवडणूक; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी; आचारसंहिता लागू

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ४ नोव्हेंबर : मुंबई प्रतिनिधी │ राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर घोषणा करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदान २ डिसेंबर रोजी होणार असून, मतमोजणी व निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यासह राज्यभरात ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगरपंचायती, ३३६ पंचायत समित्या आणि २४६ नगरपालिकांची मुदत संपली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून, राज्यातील १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावतील. त्यासाठी राज्यात १३ हजार ३५५ मतदान केंद्रांसह १३ हजार कन्ट्रोल युनिट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

विभागनिहाय पाहता कोकण विभागात १७, नाशिकमध्ये ४९, पुण्यात ६०, संभाजीनगरमध्ये ५२, अमरावतीत ४५ आणि नागपूर विभागात ५५ अशा एकूण २४६ नगरपरिषदांच्या तसेच ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये १० नवनिर्मित आणि २३६ मुदत संपलेल्या नगरपरिषदा, तर १५ नवनिर्मित आणि २७ मुदत संपलेल्या नगरपंचायतींचा समावेश आहे.

या निवडणुकीत एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवडले जाणार असून, यंदा उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी १५ लाख, तर क वर्ग नगरपालिकांसाठी ७ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होणार असून, उमेदवारी अर्ज पोर्टलवर भरल्यानंतर त्याची प्रिंट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावी लागणार आहे. एका प्रभागासाठी उमेदवाराला अधिकाधिक चार अर्ज दाखल करण्याची परवानगी असेल. तसेच प्रत्येक उमेदवारासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, अर्ज प्रक्रियेत पावती स्वीकारली जाईल.

मतदारांच्या सोयीसाठी ईव्हीएम प्रणालीचा वापर होणार असून, मतदार याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. आयोगाने मतदारांसाठी विशेष मोबाईल अॅप आणि ‘सर्च फॅसिलिटी’ उपलब्ध करून दिली आहे. दुबार मतदार ओळखण्यासाठी ‘डबल स्टार’ चिन्ह दाखवले जाणार असून, अशा मतदारांकडून दुसऱ्या ठिकाणी मतदान न करण्याचे जाहीर लेखी निवेदन घेतले जाईल.

मतदान केंद्रांवर दिव्यांग, गरोदर महिला, तान्ह्या बाळांसह आलेल्या महिलांसाठी तसेच ज्येष्ठांसाठी स्वतंत्र सुविधा असणार आहेत. गुलाबी मतदान केंद्रांवर पूर्णतः महिला कर्मचारीच काम पाहतील. मतदान केंद्रावर मोबाईल वापरास सक्त मनाई असेल.

नगरपरिषदांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने पार पडतील, तर नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी एक सदस्य आणि अध्यक्षाची निवड होणार आहे.

या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चैतन्यमय झाले असून, आगामी आठवड्यांत सर्वच पक्षांकडून उमेदवार निवड, प्रचार आणि तिकीटवाटपाच्या हालचालींना वेग येणार आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button