जळगाव दि.२४ मे २०२४ : रामदेववाडी कार अपघात प्रकरणातील संशयित आरोपी अर्णव अभिषेक कौल व अखिलेश संजय पवार यांना पोलिसांनी अटक करुन शुक्रवारी जळगाव येथील ५ वे सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर न्या. वसीम एम.देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले. तपासाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी यावेळी इतर आरोपींना पकडणे, गाडीत आणखी गांजा होता का? याचा शोध घेणे, घटनास्थळी दुसरी कार का आली होती, दोन्ही वाहनात शर्यत सुरु होती का? याचा तपास करण्याकामी १४ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. न्या.देशमुख यांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेत दोघांना २७ मे पर्यंतच पोलीस कोठडी सुनावली.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील स्वाती निकम यांनी कलम ३०४ ची बाजू मांडत संशयित आरोपी सज्ञान असून भरधाव वाहन चालवण्याने अपघात होऊ शकतो, याची त्यांना माहिती होती. वाहनात गांजा मिळून आला असून गांजा बाळगणे देखील गुन्हा आहे. तसेच पोलीस रिमांडमधील मुद्यांचा विचार करता पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. संशयित आरोपी अर्णव कौल याच्यातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.प्रकाश बी. पाटील यांनी बाजू मांडली, तर संशयित आरोपी अखिलेश संजय पवार याच्यातर्फे ॲड.सागर चित्रे यांनी बाजू मांडली. तपासाधिकारी संदीप गावीत म्हणाले की, संशयित आरोपी अखिलेश पवार याने जबाबात वाहन अर्णव कौल हा चालवित असल्याचे सांगितले आहे. वळण रस्त्यावर वाहनाचा वेग ३० किमी मर्यादेत हवा असताना तो नियंत्रणात नव्हता. त्यावर ॲड.अकील इस्माईल यांनी अर्णव वाहन चालवत असल्याचा रिमांड रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख नाही. तसेच जर अर्णव कौल हा वाहन चालवत होता तर अखिलेश पवार याचा संबंधच येत नसल्याचा युक्तीवाद ॲड.अकील इस्माईल यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि तपास अधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायाधीश वसीम एम.देशमुख यांनी दोघांना २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील स्वाती निकम यांनी तर संशयित आरोपींतर्फे ॲड. प्रकाश बी.पाटील, ॲड. अकील इस्माईल, ॲड.सागर चित्रे यांनी काम पाहिले.
ॲड.प्रकाश बी. पाटील यांचा युक्तीवाद
एका अनोळखी माणसाच्या म्हणण्याप्रमाणे या वाहनात चार लोक होते. गाडीमध्ये चार लोकांपैकी कोर्टापुढे हे दोन लोकांना हजर केले ते कोण होते. त्याबद्दल स्पष्टीकरण कोर्टापुढे दिलं गेलेला आहे ते पोलिसांना सुद्धा माहिती आहे. मात्र, त्यांनी आम्हाला सगळं तपास करायचे आहे परंतु तपास करायचा ते काही कारण एवढं रिलायबल नाही. दुसरी गोष्ट अशी की, दोघ आरोपींपैकी कोण स्वतः तिथे ड्राईव्ह करत होता की पर्टिक्युलर गाडी कोण चालवित होता, असा कुठेही पुरावा काहीही नाही. फिर्यादीत सुद्धा नाही. रिमांड रिपोर्टमध्ये सुद्धा तसं काही पुरावा नमूद केलेले नाही. त्यामुळे यांना रिमांड देऊ नये, असा युक्तीवाद ॲड.प्रकाश बी. पाटील यांनी केला.
ॲड.सागर चित्रे यांचा युक्तीवाद
फिर्याद वाचल्यानंतर कलम ३०४ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा यांच्यात लागू होत नाही. रामदेववाडी अपघाताची घटना ही दुर्दैवी घटना आहे. आमचं न्यायालयाला हेच म्हणणं होतं की ३०४ आयपीसी हा गुन्हा लागू होत नाही. जास्तीत जास्त कलम २७९अ, ज्याला आपण दुर्भाग्य घटना घडलेली आहे. कलम ३०४ हा एक कलर दिलं गेलेला आहे, असं मला वाटतं. सात तारखेची घटना आहे. २४ तारखेला तुम्ही त्याला अटक करताय. १४ ते १५ दिवस हे दोघेही आरोपी मुंबईची हॉस्पिटलमध्ये होते. मग तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही? की आपण त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करावी, पोलीस गप्प बसले होते. जनरली हे असं होत नाही, असा युक्तीवाद ॲड.सागर चित्रे यांनी केला.
अभिनेते सलमान खानच्या केसचा दिला दाखला
मी कोर्टासमोर हे दोन ते तीन उदाहरण दिले. मी परत इथे आपल्या समोर सांगत नाही. परंतु सलमान खानची जी केस आहे त्यात पण असंच घडलेलं होतं. गाडीमध्ये जो कोणी माणूस ड्रायव्हरच्या बाजूला बसला असेल. तुम्ही त्यांच्याविरुद्ध ३०४ कलम लावणार का? हे कायद्याला धरून नाही. बसमध्ये पन्नास-पन्नास लोक जातात. ऍक्सीडेंट होतो तर तुम्ही ड्रायव्हरसोबत गाडीचा कंडक्टर असेल आणि इतर लोक बसले असतील. त्यांना तुम्ही ३०४ कमल लावणार का? माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय वाटतं ते ३०४ लावणं हे अतिरेकच आहे, असा युक्तीवाद ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश बी.पाटील यांनी केला.