जळगांव दि २७ : शिक्षणा सोबतच अवांतर वाचनाची मजबूत जोड द्यायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक असल्याने शहरातील उपक्रमशील शाळा श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात २७ फेब्रुवारी पासून “कवी “कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिवस व मराठी राजभाषा दिनाचे निमित्त साधून विद्यालयात कवी कुसुमाग्रज वाचन कट्टा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी कुसुमाग्रजांची प्रतिमा पूजन करून या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाला २०० पुस्तके त्यांनी भेट म्हणून दिली.
कवी कुसुमाग्रज वाचन कट्टयात’ अभ्यासक्रमासह गोष्टी, कविता, कादंबरी, चिंटू, बालमित्र, चित्रप्रदर्शन तसेच दररोजचे वर्तमानपत्र या ठिकाणी वाचनासाठी ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना यातून नवीन माहिती देखील मिळेल, त्यांचे मनोरंजनही व वाचनाची गोडी देखील निर्माण होईल.
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच त्यांची पुस्तकांशी मैत्री व्हावी यासाठी ” कवी कुसुमाग्रज वाचन कट्टा’ सुरू करण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली. यावेळी सातवीच्या विद्यार्थिनींनी मराठी गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.