जळगावमहाराष्ट्र

नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा – कुलगुरू प्रा.व्ही. एल माहेश्वरी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पत्रकार कार्यशाळा संपन्न

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २४ मार्च २०२५ |

नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा असून विकास पत्रकारितेद्वारा सरकारी योजना जनतेपर्यत पोहचविण्याचे काम पूर्वकाळापासून प्रसारमाध्यमांनी केले आहे. असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा, विभागीय अधिस्वीकृती समिती,नाशिक व जिल्हा माहिती कार्यालय,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेत “विकास पत्रकारिता : काल, आज, उद्या” या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा.माहेश्वरी बोलत होते. यावेळी मंचावर नाशिक येथील विभागीय माहिती उपसंचालक डॉ.किरण मोघे, अहिल्यानगर येथील विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके, जळगाव येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर व जिल्हाधिकारी कार्यालयाचे मिलिंद बुवा हे उपस्थित होते.

प्रा.माहेश्वरी पुढे म्हणाले की पूर्वीच्याकाळी लोकांपर्यंत माहिती पोहचविण्याचे काम वर्तमानपत्रे, रेडीओ, टीव्ही ही साधने करीत होती. आता तंत्रज्ञानात झालेला बदल व सोशल मिडीया या सारखी संसाधने वाढल्याने सरकारच्या योजना सर्वसाधारण जनतेपर्यंत सहज पोहचल्या जात आहेत. प्रसार माध्यमांद्वारे विकास पत्रकारितेचे काम चांगल्या पध्दतीने होत आहे. प्रारंभी प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमीका सांगितली. उद्घाटनसत्राचे सुत्रसंचालन डॉ.गोपी सोरडे यांनी केले तर आभार डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी मानले.

उद्घाटनसत्रानंतर मिलिंद बुवा यांनी “प्रशासनात एआय चा वापर ” या विषयावर सविस्तर माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. विभागीय उपसंचालक डॉ.किरण मोघे यांनी “पत्रकारांसाठीच्या विविध विकास योजना” या विषयावर माहिती दिली. अधिस्वीकृती पत्रिका-निकष आणि प्रक्रिया या संदर्भात विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुधीर लंके यांनी विवेचन केले. पुढील सत्रात जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी “शासकिय योजना आणि विकास पत्रकारिता” यावर भाष्य केले. त्यानंतर जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी “विकास पत्रकारितेतील स्थित्यंतर” या विषयावर विवेचन केले. समारोप प्रसंगी प्रा.डॉ. सुधीर भटकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील हे 31मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा यावेळी कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी यांनी कुलगुरुंची तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार केला.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ॲड.सूर्यकांत देशमुख,मंगेश बाविसाने, रंजना चौधरी,धनंजय देशमुख, भिकन बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button