ऑनलाइन औषध विक्रीविरोधात उद्या जळगाव जिल्ह्यात ‘भव्य मोर्चा’ आणि ‘एक दिवसीय संप’
जनआरोग्य व केमिस्ट बांधवांच्या हक्कांसाठी औषध विक्रेत्यांचा एल्गार

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. १९ : ऑनलाइन औषध विक्री (E-Pharmacy) मुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून पारंपरिक औषध विक्रेते आणि केमिस्ट बांधवांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनच्या वतीने बुधवार, दिनांक २० मे रोजी ‘एक दिवसीय लाक्षणिक संप’ पुकारण्यात आला आहे.
या संपामध्ये जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील औषध विक्रेते उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असून सर्व केमिस्ट दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ आणि जनजागृतीसाठी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत.
असा असेल मोर्चाचा मार्ग
एकत्र येण्याचे ठिकाण: खानदेश सेंट्रल, जळगाव
दिवस व दिनांक: बुधवार, २० मे
वेळ: सकाळी ठीक १०:०० वाजता
खानदेश सेंट्रल येथून मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर असोसिएशनच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा लढा केवळ औषध विक्रेत्यांचा नसून जनआरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठीचा आहे. त्यामुळे नागरिकांनी या आंदोलनास सहकार्य करावे,
असे आवाहन सुनील भंगाळे सदस्य – अखिल भारतीय औषधी विक्रेता संघ (AICDF), तथा जिल्हाध्यक्ष – जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन मोबाईल क्रमांक: ९४२२७७५६९३ यांनी केले आहे.






