
| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : जळगांव महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून युवा आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या पदभार स्वीकृती सोहळ्याकडे प्रशासनासह शहरवासीयांचेही लक्ष लागले होते. शहराच्या वाढत्या नागरी गरजा, पायाभूत सुविधांवरील ताण, प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेता नव्या आयुक्तांकडून प्रभावी व गतिमान नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त आदित्य जीवने यांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा प्राथमिक आढावा घेण्यास सुरुवात केली. शहरातील स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमण निर्मूलन, मालमत्ता कर वसुली तसेच विविध विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेत आगामी कार्यपद्धती निश्चित करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नव्या आयुक्तांच्या स्वागतावेळी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विकासाभिमुख आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविणे, प्रशासनातील समन्वय वाढविणे आणि नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जळगाव शहरातील अनेक महत्त्वाकांक्षी विकासकामे सध्या विविध टप्प्यांवर आहेत. काही प्रकल्प रखडलेले असून अनेक नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. अशा परिस्थितीत नव्या आयुक्तांसमोर शहर विकासाला गती देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळणार का, प्रशासन अधिक उत्तरदायी व कार्यक्षम होणार का आणि शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार का, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
जळगाव महानगरपालिकेला युवा प्रशासकीय अधिकारी लाभल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत आशावाद व्यक्त केला जात असून आगामी काळातील त्यांच्या निर्णयांकडे नागरिकांसह राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचेही लक्ष लागून राहिले आहे.






