जळगावजिल्हा बँक निवडणूक

जिल्हा बँक निवडणूक; मंत्री रक्षा खडसेंना दिलासा तर विद्यमान अध्यक्ष संजय पवार, आमदार अनिल पाटील, सुमित किशोर आप्पा पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद

रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरील हरकती फेटाळल्या!

| लोकमाध्यम News | ( पांडुरंग महाले ) जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर दाखल करण्यात आलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रक्षा खडसे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे पूर्वी कार्यकर्ते राहिलेल्या तिघा उमेदवारांनी हरकती घेतल्या होत्या. या हरकतींमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या हरकती फेटाळल्याने रक्षा खडसे यांची उमेदवारी वैध ठरली आहे.

संजय पवार, अनिल पाटील, सुमित पाटील यांचे अर्ज बाद

दुसरीकडे, जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार आणि आमदार अनिल पाटील यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यासंदर्भातील सहकार कायद्यातील तरतुदीचा त्यांना फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आमदार किशोरआप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचाही उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांना धक्का बसला आहे.सलग दहा वर्षे संचालकपद भूषविल्यामुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनाही यंदाच्या निवडणुकीपासून दूर राहावे लागले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनली आहे.

अर्ज भरण्याच्या दिवशीच चार उमेदवार बिनविरोध

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील, मातोश्री नलिनी पाटील आणि सतीश परशुराम शिंदे हे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

२१ जागांसाठी ४०२ अर्ज; ९३ अर्ज बाद

जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांसाठी तब्बल ४०२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी प्रक्रियेनंतर त्यापैकी ३०९ अर्ज वैध ठरविण्यात आले, तर ९३ उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. बाद झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची संधी उपलब्ध आहे.

दरम्यान, येत्या २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अर्जांच्या छाननीनंतर बदललेले राजकीय समीकरण, प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीची स्थिती आणि बिनविरोध निवडून आलेले उमेदवार यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button