मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री १३ऑगस्टला जळगावात
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कार्यक्रम : पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ८ ऑगस्ट २०२४ |
राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण ‘ योजनेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्क जळगाव येथे १३ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला बहिणी मोठ्या संख्येनी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
या संदर्भात जिल्हा नियोजन विभागाच्या बैठक कक्षात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आ.सुरेश भोळे, आ. चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 5,33,959 एवढ्या बहिणींचे अर्ज आले होते. त्यापैकी 5 लाख 9 हजार 366 एवढ्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. त्याची प्रोसेस सुरुच राहणार आहे. प्रत्येक तालुक्यातून या कार्यक्रमासाठी भगिनी येणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी संबंधित यंत्रणेनी घ्यावी. कार्यक्रमस्थळी पाण्याची योग्य ती सोय करण्यात यावी. त्या दिवशी पाऊस असण्याची शक्यता लक्षात घेवून सभा मंडपाची सोय केली आहे. अधिकाधिक वाहनतळ तेही सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावीत असे जिल्हा पोलीस प्रशासनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिले.