महाराष्ट्रजळगांव जिल्हा

लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेसह महिला सक्षमीकरणाला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धरणगाव येथील बालकवी स्मारकाचे ई‌ - भूमिपूजन

लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. १३ ऑगस्ट २०२४ |

जळगाव शहरातील रस्ते कामांसाठी शंभर कोटींचा निधी, एमआयडीसीत नवीन उद्योग आणणार

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात केले.

जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रूपये देण्यात येतील. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग आणण्यात येतील. अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा आज संपन्न झाला. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह‌ विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. धरणगाव बालकवी स्मारकाचे ई- भूमिपूजन यावेळी संपन्न झाले.
या महिला सक्षमीकरण मेळाव्यास व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री आ.चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ. लता सोनवणे, आ.किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी बोलतांना‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ जळगावच्या पवित्र भूमित जन्मलेल्या बहिणाबाईंचं हे काव्य आहे. संपूर्ण जगणे, आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलंय. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात. बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्यासाठीच आम्ही राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे पुढच्या आठवड्यात १७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्हीही हप्ते पडतील आणि नंतर प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत राहील. या महिन्यात ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात १ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन – प्रशासनाच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासनस्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी ३३ हजार कोटी आर्थ‍िक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार आहे. अशा‌ शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी महिला भगिनींना आश्वस्त केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहेत. तरूणांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत‌. यात तरूणांना महिन्याला १० हजार मानधन देण्यात येत आहे. गेल्या वर्षी शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरु केले. केवळ वर्षभरात २ कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा फायदा झाला. लेक लाडकी योजनेतून मुलींना वयाच्या १८ वर्षानंतर एक लाख रूपये मिळणार आहेत. असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा वीज सवलत, वयोश्री योजना तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफीचा निर्णय अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार असून यातील एकही योजना बंद होणार नाही यांची ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.

जळगाव जिल्ह्यात नार-पार प्रकल्पाचे पाणी आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गिरणा नदीवरील नार-पार प्रकल्पासाठी राज्यपालांची मान्यता घेण्यात आली आहे. या सिंचन प्रकल्पाचे पाणी जिल्ह्यात आणण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. पाडळसे व बोदवड सिंचन प्रकल्पास निधी उपलब्ध करून दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावून जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी शासन कटीबध्द असल्याची ग्वाही ही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राज्यातील महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे. यासाठी महिला सक्षमीकरणाचे काम राज्यात करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेत महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत आहे. यातून महिलांच्या संसाराला हातभार लागणार आहे. महिलांना एकदा दिलेले पैसे कधीच परत घेतले जाणार नाहीत. अशी १ कोटी ३५ लाख अर्ज पात्र आहेत. यातील ३५ लाख महिलांचे बॅंक खाते आधार लिंक बाकी आहेत. या महिलांचे खाते लिंक करून लवकरच त्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही.

महाराष्ट्रात १५ लाख महिला लखपती दिदी करण्यात आलेल्या आहेत. या महिलांना लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ तारखेला जळगाव येथे आहेत. महिलांना तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. महिलांना एसटीतील ५० टक्के सवलतीमुळे एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. महिलांच्या हातात पैसे पडल्यामुळे ते त्याचा सदुपयोग करतात‌ त्यामुळेच महिलांना बळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुलींकरिता शासनाने मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे. महिला सक्षम झाल्यावर महाराष्ट्र देशात विकासाच्या पुढे जाईल.

जिल्ह्यातील केळी, पाटबंधारे प्रकल्पांना न्याय देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव जिल्ह्यातील जिल्ह्यातील केळी, पाटबंधारे प्रकल्पांना न्याय देण्याचे काम शासन करणार आहे. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, गरीब, युवा, शेतकरी व महिलांसाठी हितकारक ठरणाऱ्या योजना राबविण्याचा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला. अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांना जुलैपासून महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्राचे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी निधीची चणचण नाही. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे‌. राज्यातील विकासकामांवर परिणाम होऊ न देता ही योजना राबविण्यात येत आहे. हे पैसे थेट महिलांच्या बॅंक खात्यात येणार आहे. या योजनेमुळे वर्षाला ४६ हजार कोटी खर्च होणार आहे. त्यातून बाजारात पैसा येऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी वीजबिल सवलतीची बळीराजा योजना आणण्यात आली आहे‌.असे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात ५ लाख ९ हजार एवढ्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. यातून महिन्याला ८८ कोटी रूपये बहिणींना देण्यात येणार आहेत. मागील अडीच वर्षांत सर्वात जास्त योजना महाराष्ट्रात महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सामुदायिक निधी अंतर्गत सावित्रीबाई फुले प्रभातसंघ, झेप महिला प्रभात संघ,स्त्री शक्ती महिला प्रभात संघ या महिला बचतगटांना प्रत्येकी 24 लाख 60 हजार रूपयांच्या अनुदानाचा धनादेशांचे वितरण करण्यात आले.

लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण

या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे व लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. श्री.समर्थ महिला बचत गट, अयोध्या नगर ( नागरी उपजिवीका मिशन अंतर्गत धनादेश वितरण ), तनिषा पोरवाल ५० लक्ष, शितल विसपुते २० लक्ष, अक्षिता पाटील १० लक्ष (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लाभ धनादेश वितरण), माऊली महिला बचत गट, बिलवाडी, श्री.गणेश महिला बचतगट,बोरनार ( समुदाय गुंतवणूक निधी प्रत्येकी ६ लाख धनादेश वितरण) दुर्गा महिला बचत गट,चिंचखेडे प्र., कालिंका माता महिला बचत गट,चिंचगट प्र.( मानव विकास मिशन अंतर्गत ई-रिक्षा ), शितल वानखेडे, रोहन देसले ( मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नियुक्ती पत्र), आरती श्रीनाथ, सरला भिसे, निकीता पाटील, जागृती पाटील, पुजा श्रीनाथ ( पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत नियुक्ती पत्र ) जनाबाई कोळी, धानोरा, मीराबाई कसोदे पाळधी खु., शांताबाई गरजे बाभळे, आशा तडवी, आडगाव यांना (राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गत शबरी व रमाई घरकुल आवास योजना ) धनश्री नेमाडे, देवाश्री पाटील यांना (कृषी विभागामार्फत ड्रोन वाटप ), देवांश्री पाटील या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. यातील‌ काही महिलांनी शासकीय योजनांच्या लाभामुळे जीवनमानात झालेल्या बदलाविषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सर्वधर्मीय महिलांनी व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधली व त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुख्यमंत्र्यांचे महिलांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कवियित्री बहिणाबाईंचा पुतळा व बचतगटांच्या वस्तूंचा संच देऊन स्वागत करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी लिहिलेल्या मानपत्राचे यावेळी वाचन करण्यात आले. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी, जळगाव जिल्ह्यातील बहिणींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहलेले भावनिक पत्र जिल्ह्यातील बहिंणींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात दोन बहिणींच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी या पत्राची दृकश्राव्य चित्रफित ही दाखविण्यात आली. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची रूपरेषा डॉ.अमोल शिंदे यांनी सादर केली. सूत्रसंचालन‌ हर्षल पाटील आणि अपूर्वा वाणी यांनी केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button