जळगाव मध्ये 25 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमाचा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा
विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना; जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण
लोकमाध्यम न्युज | Lokmadhyam News | जळगांव दि.२० ऑगस्ट २०२४
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऐतिहासिक ‘लखपती दीदी’ या महिला मेळाव्याला येणाऱ्या महिलांच्या जेवणाची, पाण्याची, स्वच्छतागृहाची अत्यंत नियोजनबद्द सोय करावी अशा सूचना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा या कार्यक्रमाचे समन्व्यक आर. एस. लोखंडे, संबंधित यंत्रणांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पार्किंग व्यवस्थेबाबत अलर्ट रहा
त्या त्या ठिकाणावरून येणाऱ्या बसेसची सोय, त्यांच्यासाठी सोयीची होईल अशीच करावी. याची जबाबदारी महानगरपालिकेची असली तरी पोलिसांच्या समन्वयाने ही पार्किंग केली जावी. या बाबत संबंधित यंत्रणांनी अलर्ट राहावे अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी दिल्या.
कार्यक्रम स्थळी बॅग, पाणी बॉटल आणू नयेत
कार्यक्रम स्थळी येताना सोबत कोणतीही बॅग किंवा पाणी बॉटल घेवून येऊ नयेत. इथे प्रत्येक सेक्टरवाईज पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या संदर्भातील जबाबदारी असणाऱ्या विभागाने, व्यक्तीने हा संदेश द्यावा. प्रत्येक बसेसला क्रमांक द्यावेत, जेणे करून महिलांना त्यांच्या गाडे शोधणे सुलभ होईल अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. सर्वांनी दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, यानंतरही आपण याचा आढावा घेणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा, आणि कोणत्या विभागाची कोणती जबाबदारी राहिल या विषयी सादरीकरण केले.
कार्यक्रमस्थळाची पाहणी
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विमानतळाच्या समोर जिथे कार्यक्रम होणार आहे. तिथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.