लोकमाध्यम न्युज | जळगाव १० ऑक्टोबर २०२४ |
जळगाव शहरात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असताना पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागील बाजूस एका ५७ वर्षीय महिलेची हत्त्या करण्यात आली आहे. भरवस्तीत महिलेच्या डोक्यात काहीतरी वस्तूने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून हा खून असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागील बाजूस असलेल्या रणछोड नगर परिसरात राहणारे राजेश नवाल यांचे दाणाबाजारात धान्याचे दुकान आहे. गुरुवारी ते दुकानावर गेलेले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावाची पत्नी देखील मंदिरात गेलेली होती. राजेश नवाल यांच्या पत्नी सुवर्णा नवाल वय-५७ या घरी एकट्याच होत्या.
रात्री ९ वाजेच्या सुमारास राजेश नवाल हे घरी आले असता घरात त्यांच्या पत्नी सुवर्णा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस पथक पोहचले आहे.अधिक तपास करत आहेत
मयत सुवर्णा नवाल यांच्या पश्चात २ मुली आणि १ मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी विवाहित असून मुलगा आणि मुलगी नोकरीनिमित्त पुणे, मुंबई येथे असतात. घटना नेमकी कशी आणि कोणत्या कारणाने घडली हे अद्याप समजू शकले नसून तपास सुरू आहे.