जयश्री महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लोटला जनसागर
नारीशक्तीवर दाखविलेला विश्वास जळगावकर निश्चित सार्थ ठरवतील असा विश्वास
लोकमाध्यम न्युज | जळगांव २९ ऑक्टोबर २०२४ |
जळगावच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून व समस्त जळगावकरांना मुलभूत सुविधा मिळवून देण्याचे ध्येय घेऊन जळगाव शहर मतदारसंघाकरिता धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरला. विधानसभा २०२४ निवडणुकीसाठी जयश्रीताईं महाजन यांच्या उमेदवारी अर्ज नामांकन प्रक्रियेत जळगाव शहरात जनसागर उसळला. जयश्रीताईंनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व आपल्या असंख्य समर्थकांसह शिवतीर्थ मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन या रॅलीची सुरुवात केली.
या रॅलीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना उपनेते संजयजी सावंत, जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, काँग्रेसचे महानगर प्रमुख शामभाऊ तायडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महानगर प्रमुख एजाज मलिक, अल्पसंख्यांक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे, शिवसेना महानगर संघटिका गायत्री सोनवणे, मनीषा पाटील, राष्ट्रवादी महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, माजी महापौर नितिनभाऊ लड्ढा, राखीताई सोनवणे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, ज्योतीताई तायडे, चेतन शिरसाळे, सत्यजीत पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पीयुष गांधी, प्रीतम शिंदे, विशाल वाणी, अमित जगताप, यश सपकाळे, हर्षल मुंडे आदी मान्यवरांसह शिवसेना(उ.बा.ठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचार रॅली शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन सुरू झाल्यानंतर चित्रा चौक, टॉवर चौक, महापालिका परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जयश्रीताईंनी त्यांच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतले. त्यानंतर नेहरु पुतळा मार्गे स्टेशन चौक यामार्गे तहसील कार्यालय येथे पोहचली. संपूर्ण परिसरात जयश्रीताईंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी दणाणून गेलो होता. जयश्रीताईंच्या रॅलीतील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहरात उत्साहाचे वातावरण पसरले होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना जयश्री महाजन म्हणाल्या की, अडीच वर्षे महापौर असतांना जळगाव शहराचा बॅकलॉग मला माहिती आहे. शहरातील कोणती क्षेत्र विकसित करावयाची आहेत, त्याचा माझा अभ्यास झाला आहे. औद्योगिक क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, शिक्षण, आरोग्य व दळणवळणाची साधने विकसित करण्यासाठी महाविकास आघाडीने मला उमेदवारीची संधी देवून, नारीशक्तीवर दाखविलेला विश्वास जळगावकर निश्चित सार्थ ठरवतील असा विश्वास मला आहे.