भारतीय स्टेट बँकेत जीवन प्रमाणपत्रासाठी जेष्ठ नागरिकांची आदरातिथ्यपूर्ण सोय; निवृत्तीवेतनधारकांसाठी आदर्श व्यवस्था

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ४ नोव्हेंबर : सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी त्यांच्या निवृत्तीवेतनाच्या सातत्यासाठी जीवन प्रमाणपत्र (हयाती दाखला) सादर करणे आवश्यक असते. या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्यात जिल्हा कोषागार आणि बँका या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विशेष सुविधा पुरवितात. आज भारतीय स्टेट बँकेच्या जळगाव मुख्य शाखेत जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांसाठी बँकेने आदर्श व्यवस्था करून सर्वांचे कौतुक मिळवले.
शाखेत आलेल्या नागरिकांसाठी विशेष शामियाना उभारून आसनव्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक नागरिकाला आगमनानंतर टोकन देण्यात येत होते, त्यानंतर त्यांचे आदराने स्वागत करून चहा-पाण्याची सोयही करण्यात आली होती. टोकन क्रमांकानुसार संबंधित कर्मचाऱ्यांकडे बोलावून घेऊन त्यांचे बँक पासबुक, आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत होती. रजिस्टरवर स्वाक्षरीची प्रक्रिया झाल्यानंतर जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची औपचारिकता पूर्ण होत होती.
याशिवाय ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देखील बँकेत उपलब्ध करून देण्यात आली होती. केंद्रीय सरकारी कर्मचारी, संरक्षण दलातील अधिकारी व इतर सरकारी सेवकांसाठी ही ऑनलाईन सोय विशेष उपयुक्त ठरली. संपूर्ण प्रक्रियेत शिस्तबद्धता, आदर आणि आपुलकीचा भाव जाणवत असल्याने जेष्ठ नागरिकांनी या अनुभवाचे विशेष कौतुक केले.
भारतीय स्टेट बँकेचे शाखा प्रमुख, त्यांचे सहकारी अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी दाखविलेल्या सौजन्यपूर्ण वर्तनामुळे वातावरणात आनंदाचे आणि समाधानाचे भाव निर्माण झाले. जीवन प्रमाणपत्र सादरीकरणाची ही सुलभ व सुसंस्कृत व्यवस्था इतर बँकांसाठीही आदर्श ठरेल, अशी प्रतिक्रिया उपस्थित जेष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.





