
| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २० ऑक्टोंबर २०२५ : मनुष्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी स्वच्छता मोहीम बाहेरची नसते, ती मनाच्या आत घडली पाहिजे. आपण रोज घर झाडतो, अंगण धुतो, वस्तू आवरतो; पण मनात वर्षानुवर्षं साचलेला राग, द्वेष, मत्सर, असूया यांचा कचरा मात्र तसाच ठेवतो. हा कचरा दिसत नाही, पण जाणवतो. चेहऱ्यावर, नात्यांमध्ये, आणि मन:शांतीत.मन ही एक अदृश्य पेटी आहे. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक वाईट अनुभव, प्रत्येक अपमान आपण तिथे साठवत राहतो.
कोणी दुखावलं, कोणीतरी मागे बोललं, काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, की आपण म्हणतो “ठेवू दे मनात.” पण ते ठेवू देणं म्हणजे खरं तर आपल्याच मनात जखम ठेवणं आहे.
काळाच्या ओघात ही पेटी भरत जाते. रागाचा गंध साठतो, द्वेषाचं ओझं वाढतं, आणि एक दिवस आपण स्वतःच त्या वासात घुसमटायला लागतो. बाहेर सगळं ठीक असतं. नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, पण आतमध्ये अस्वस्थता, असंतोष, चिडचिड. कारण मनाची कचरा पेटी ओसंडते आहे.
आपल्याला कुणावर प्रेम करायला शिकवलं जातं, पण माफ करायला नाही.
माफ करणं म्हणजे पराभव नाही; ते तर मनाच्या भारातून मुक्त होण्याचं धैर्य आहे. ज्याला आपण माफ करतो, त्यापेक्षा जास्त आपण स्वतःलाच मुक्त करतो.
जसं घरातील कचरा दररोज बाहेर टाकतो, तसंच मनाचाही कचरा दररोज झाडायचा. राग आला झटकून टाकायचा, मत्सर वाटला, स्वीकारायचा आणि सोडून द्यायचा. मनाला रोज हवेचा झोत लागला की आत्मा प्रसन्न राहतो. मन रिकामं झालं की शांती आपोआप भरते.
शेवटी, जग स्वच्छ करण्याआधी मन स्वच्छ ठेवा. कारण स्वच्छ मनातच प्रेम फुलतं, आणि प्रेमातच जीवनाचं सौंदर्य आहे.
या दिवाळीत फक्त घर झाडू नका तर मनही झाडा. जसा अंधार दूर करण्यासाठी आपण दिवे लावतो, तसाच मनातील अंधार दूर करण्यासाठी क्षमा, प्रेम आणि शांततेचे दिवे लावा. आपलं मन जितकं स्वच्छ, तितकंच आयुष्य प्रकाशमान. मनातला कचरा झटकून टाका, द्वेषाचा धूर जाळून टाका..
आपणा सर्वांना मनःपूर्वक दीपावलीच्या शुभेच्छा..प्रकाश फक्त बाहेरच नव्हे, आत मध्येही उजळो..!

ॲड जमील देशपांडे अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान, जळगांव






