
| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. १३ : नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत घेऊन सासरी आलेल्या २१ वर्षीय नवविवाहितेचा माहेरी जात असताना झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी जळगाव शहरात घडली. या अपघातात तिच्यासोबत असलेले काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
मृत नवविवाहितेचे नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे आहे. त्यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर परिसरात राहणारे पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात झाला होता. विवाहानंतर नवदांपत्याने देवदर्शनाचा कार्यक्रमही पूर्ण केला होता.

सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे रवाना झाले. दुपारी सुमारे चारच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत वैशाली यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काका गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली.
काही दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. आनंदाचे वातावरण क्षणार्धात शोकात बदलल्याने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अपघातास कारणीभूत वाहनाचा शोध घेत पुढील तपास सुरू आहे.






