
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २६ मार्च – दशरथ नगर येथे सुरू असणाऱ्या श्री शिव महापुराण कथेत पाचव्या दिवशी कार्तिक स्वामी आणि भगवान गणेशांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी भगवान गणेशांची सजीव आरास करण्यात आली होती. अग्रपूजेचे दैवत असणाऱ्या गणपती बाप्पांची मातृ पितृ भक्ती ही जगाला खूप मोठा आदर्श ठरणारी आहे. कलियुगात मातृ पितृ सेवा ही ईश्वर सेवा समजून केली पाहिजे. आपल्या मुलांना आपण संपत्ती देण्यापेक्षा आधि संस्कार देणे फार गरजेचे आहे. त्यासाठी कथांचे श्रवण कलियुगात श्रेष्ठ आहे.
भगवान शंकरांना सुद्धा कथा सांगणे व ऐकणे अतिशय प्रिय आहे स्वतः भोलेनाथ सांब सदाशिव पार्वती मातेला अनेक कथा सांगतात. शिव हे संपूर्ण विश्वाचे मूळ असून जगाला शांतीचा संदेश देणारे आहेत. जे शिवांचे भक्त असतात त्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी असणे हीच खरी त्यांची श्रीमंती असते,शिवांचे भक्त सुखदुःखाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा भगवान शिवांचे स्मरण सातत्याने करतात. गरीब असो की श्रीमंत असो पण भगवान शिवांसाठी सर्व सम आहेत. जिथे सर्वांची शान सम असते अशा समशानात म्हणजेच स्मशानात शिव राहतात असे प्रतिपादन ह भ प देवदत्त महाराज यांनी कथेतून केले.कथेला दररोज वाढणारी भाविकांची उपस्थिती आणि उत्साह लक्षणीय होता. जास्तीत जास्त भाविकांनी या श्री शिव महापुराण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक युवा दशरथ नगर मित्र मंडळ व पवन कोळी यांनी केले आहे.
आज बारा ज्योतिर्लिंगाची कथा
श्री शिव महापुराण अंतर्गत आज बारा ज्योतिर्लिंगाची कथा व एकादश रुद्र अवतारांची कथा सांगण्यात येईल असे हरिभक्त परायण देवदत्त महाराज यांनी सांगितले.





