
| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) –शहरातील मेहरुण परिसरातील मौजे गट क्रमांक ४२४ मधील कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था असून, या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर समाजबांधवांनी स्मशानभूमीचे तातडीने विकसित व सुशोभीकरण करण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली असून याबाबतचे निवेदन महापौर दीपमाला काळे यांना देण्यात आले.
समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीचा शेवटचा प्रवास सन्मानाने व्हावा, ही सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र, सद्यस्थितीत या स्मशानभूमीत पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात सावलीचा अभाव, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, बसण्यासाठी व्यवस्था नसणे अशा अनेक मूलभूत समस्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांना अत्यंत वेदनादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
स्मशानभूमीतून नाला वाहत असून, त्याचे बंदिस्तीकरण करून दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंत उभारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विसाव्यासाठी शेड, अस्थी ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल, अंतर्गत रस्ते, स्वच्छता व्यवस्था, पेव्हर ब्लॉक बसविणे आणि परिसराचे सुशोभीकरण तातडीने करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात योगेश बागडे, राहुल नेतलेकर, शशिकांत बागडे, मोहन गौरुगे, संदीप बागडे यांच्यासह समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देत, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.निवेदन देताना अध्यक्ष योगेश बागडे, सचिव राहुल नेतलेकर,कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, वीर दहिेयेकर , मोहन गारुंगे, संदीप बागडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






