नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू; चाक निखळल्याने क्रुझर ट्रकवर धडकली
सहा जण गंभीर; वराड फाट्याजवळ भीषण अपघात

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – गुजरातहून नववधूला सासरी घेऊन जाणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ सकाळी क्रुझर वाहनाचा भीषण अपघात होऊन नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चाक निखळल्याने अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाड गुजरातमधील वापी येथून अकोल्याकडे जात होते. वराड परिसरात पोहोचताच चालत्या क्रुझरचे ( एमएच 30 एलोड 4710 ) पुढील चाक अचानक निखळले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळले. धडक इतकी भीषण होती की क्रुझर रस्त्यावर पलटी झाली.
मृत व जखमींची माहिती
या अपघातात पूजा रवी वाघळकर (वय २५), दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२) आणि जगदीश चंदूभान वाघळकर (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात प्रेम भारत वाघडकर (२४), नितेश सुरेश कटोले (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोळकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) यांच्यासह एकूण सहा जण जखमी झाले असून अंश नितेश कडोले (१४) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
जखमींवर तातडीने उपचार
जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद धरणगाव पोलीस ठाण्यात घेण्याचे काम सुरू आहे.
रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. सर्वत्र आक्रोशाचे वातावरण पाहायला मिळाले. उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. इमरान पठाण, गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. “लग्नाचा आनंद काही क्षणातच दु:खात बदलला. या भीषण अपघाताने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.”






