मोदी सरकारची १२ वर्षे; गरीब, शेतकरी, युवकांचे हित साधणारे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शासन : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : ता.१६- सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी ‘पीएम किसान सन्मान निधी’ फाईलवर स्वाक्षरी केली. यावरून हे स्पष्ट होते की, केंद्रातील एनडीए ’शासनाचे गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला यांना सर्वोच्च प्राधान्य आहे. देशातील २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. शाासनाने जन धन योजने अंतर्गत ५८ कोटींहून अधिक बँक खाती उघडली, ज्यापैकी ३२ कोटींहून अधिक महिला आहेत. कोविड-१९ महामारीच्या कठीण काळापासून ८१ कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन पुरवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांना ३२ आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत आणि ‘मॉर्निंग कन्सल्ट’ सर्वेक्षणात 75% पसंती मिळवून ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. अशी माहिती केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, विजय वानखेडे उपस्थित होते.
त्या म्हणाल्या, की मोदी सरकारने ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र केवळ एक घोषणा न ठेवता, त्याचे एका जनआंदोलनात रूपांतर केले आहे. प्रत्येक योजनेचा 100% लाभ रांगेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा, हे सुनिश्चित करणे हे सरकारचे एकमेव ध्येय राहिले आहे. आज देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा अत्यंत मजबूत आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांसारख्या कारवायांनी हे स्पष्ट केले आहे की हा एक नवा भारत आहे, जो स्वस्थ बसून राहत नाही तर प्रत्युत्तर देतो. मोदी सरकारची गेल्या 12 वर्षांची कारकीर्द हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने केलेला एक उल्लेखनीय प्रवास आहे.
गरिबांना वैद्यकीय खर्चापासून वाचवण्यासाठी, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ६० कोटींहून अधिक आरोग्य कार्ड जारी करण्यात आले आहेत, ज्यामुळे मोफत उपचारांची हमी मिळते. याशिवाय, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेने ५८ कोटींहून अधिक लोकांना भक्कम सुरक्षा कवच प्रदान केले आहे. गरिबांचे जीवन सुकर करण्यासाठी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ४ कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ११ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन त्यांना धुरापासून मुक्त करण्यात आले आहे.
जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण विकासासाठी १६ कोटींहून अधिक कुटुंबांना नळांद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्यात आले आहे स्वच्छ भारत मिशनने १२ कोटींहून अधिक शौचालये बांधून देशात स्वच्छतेच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणली आहे. पथविक्रेत्यांसाठी, पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत ७४ लाखांहून अधिक लोकांना कुठल्याही त्रासाविना कर्ज मिळाले आहे. मुद्रा योजनेअंतर्गत, लहान व्यवसायांसाठी ५७ कोटींहून अधिक तारणमुक्त कर्जे वितरित करण्यात आली आहेत. कर्जाची मर्यादाही ३ लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
माता आणि भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, लखपती दीदी योजनेअंतर्गत ३ कोटींहून अधिक महिलांना लाभ झाला आहे. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ४.५ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. राष्ट्रीय सुरक्षेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, सुरक्षा दलांमधील महिला अधिकाऱ्यांची संख्या ३ हजारवरून ११ हजारपर्यंत वाढवण्यात आली आहे. यावेळी मंत्री खडसे यांनी विविध केंद्र शाासनाच्या योजनांची माहिती दिली.






