बारडोलीजवळ जामनेर-धुळे आगाराच्या एसटीचा भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील बस चालकासह सात जणांचा मृत्यू
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन

| लोकमाध्यम न्युज | जळगाव/सुरत ( प्रतिनिधी ) : गुजरातमधील बारडोली परिसरात मंगळवारी झालेल्या भीषण एसटी बस अपघाताने महाराष्ट्रासह गुजरातमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत जामनेर आणि धुळे आगाराच्या दोन एसटी बसचा समावेश असून या अपघातात जळगाव जिल्ह्यातील चालकासह सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत-धुळे मार्गावरील एक एसटी बस गुजरातमधील व्यारा परिसरातून जात असताना मागून आलेल्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बस दुभाजक ओलांडून विरुद्ध मार्गावर गेली. त्याचवेळी जामनेरहून सुरतकडे जाणारी दुसरी एसटी बस समोरून येत होती. दोन्ही वाहनांमध्ये झालेल्या धडकेनंतर एक बस रस्त्याखाली घसरली आणि काही क्षणांतच तिला आगलागली.
आगीचे स्वरूप इतके भीषण होते की अनेक प्रवासी त्यात अडकले. चालकांसह काही प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेकांना गंभीर भाजल्याच्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस जामनेर आगाराची होती. या बसचे कुह येथील रहिवासी असलेले एसटी बस चालक यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये जळगाव जिल्ह्यातील काही प्रवाशांचा समावेश असून त्यांच्यावर गुजरातमधील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आगीत मृतदेह पूर्णपणे जळाल्याने मृतांची ओळख पटविणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे. त्यामुळे मृत व्यक्तींची खात्रीशीर ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने संकलित करण्यात येत असून त्यांची तपासणी केली जाणार आहे. अहवाल आल्यानंतरच मृतांची अधिकृत ओळख जाहीर केली जाईल. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बारडोली येथील प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला असून जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पथक गुजरातकडे रवाना करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या दुर्घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.






