ब्रेकिंग न्यूज : खदाणीच्या खोल पाण्यात बुडुन तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू!

| लोकमाध्यम न्युज | जळगाव अमळनेर प्रतिनिधी| अमळनेर शहरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला.
मानव बंटी रतनानी, वय १४, कार्तिक विकी उधवानी, वय १४ आणि दिनेश विजय पंजवानी, वय १७ अशी मृत मुलांची नावे आहेत. तिघेही अमळनेरमधील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी होते.
प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही मुले मंगळवारी सायंकाळच्या सुमारास खदाण परिसरात गेली होती. पाण्यातून चालत ते एका उंचवट्यावर पोहोचले. यावेळी सेल्फी काढताना एकाचा पाय घसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने हात दिला, तर दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही खोल पाण्यात ओढला गेला. काही क्षणांत तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे यांनी पाण्यात उतरून तिघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता.
या हृदयद्रावक घटनेमुळे सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.






