
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पत्रकार परिषदेत स्पष्टोक्ती !
| लोकमाध्यम न्युज |जळगाव : जळगाव शहरात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळामध्ये फूट पडल्याचे चुकीचे चित्र निर्माण केले जात असल्याचा दावा करत ‘डॉ.अविनाश आचार्य प्रणित सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळा’तर्फे बुधवारी (९ सप्टेंबर) रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महामंडळाचे नूतन अध्यक्ष मुकुंद मेटकर यांनी स्पष्ट केले की, महामंडळात वर्षांनुवर्षे अनेक कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने आणि एकदिलाने काम करत आहेत. असे असताना काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत.पत्रकार परिषदेत नूतन पदाधिकाऱ्यांनी व ज्येष्ठ सदस्यांनी महामंडळाची भूमिका मांडली.
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची सुरुवात आदरणीय अविनाश दादा आचार्य यांनी केली होती. त्यांच्या नावाचा गजर आम्ही महामंडळाच्या माध्यमातून करत आहोत. सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन आपले सण साजरे केले पाहिजेत. “डॉ. अविनाश आचार्य यांनी गणेत्सवाची विस्कळीत घडी बसवून मिरवणुका सुरळीत केल्या होत्या. सर्व गणेशोत्सव मंडळांनी एकाच मंचाखाली येऊन धार्मिक व सामाजिक कार्यातून जळगावला पुढे नेले पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून एकच व्यक्ती प्रमुख पदावर होती, ज्याला कोणी विरोध केला नाही. मात्र, नवीन नेतृत्वालाही संधी मिळाली पाहिजे ही सर्व मंडळांची भावना होती. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सदस्य मुकुंद मेटकर यांची अध्यक्षपदी तर दीपक जोशी यांची कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
दरवर्षी नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. लवकरच विविध समित्या गठीत करून त्यात इतर कार्यकर्त्यांचा समावेश केला जाईल. महामंडळासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर खालच्या पातळीवर आरोप होणे चुकीचे आहे. योगी दत्तनाथ महाराज (आदेश) यांनी सांगितले की, जळगावला धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उंचावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे.
डॉ. अविनाशदादा आचार्य प्रणित सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची आज बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी बैठक झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात महामंडळ म्हणून सर्व गणेश मंडळांशी संपर्क राहील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महामंडळ तत्पर राहील व कायम बांधिल राहील. पदासाठी हिंदू बांधवांमध्ये व मंडळांमध्ये वाद नको म्हणून यंदा तटस्थ भूमिका जाहीर करीत आहोत, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.





