
जागेसाठी दानशूर नागरिक, बंगला व इमारत मालकांना आवाहन
| लोकमाध्यम न्युज | जळगाव ( पांडुरंग महाले ) : जळगाव शहरात निराधार, बेघर तसेच दीर्घकाळ वैद्यकीय आणि सामाजिक आधाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी ‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी कोल्हापूर येथील केंद्राच्या दीर्घ अनुभवाचा उपयोग केला जाणार असून, या प्रकल्पाला आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. केंद्रासाठी जागा, आर्थिक निधी आणि सामाजिक सहभाग मिळविण्याच्या दृष्टीने इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेने नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.अशी माहिती सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा, जळगाव चे पदाधिकारी गनी मेमन, डॉ. मंगला ठोंबरे, सुभाष सांखला ,–डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी ,राजेश यावलकर आदी उपस्थीत होते.
जळगावमध्ये प्रस्तावित असलेले हे केंद्र केवळ रुग्णांना निवारा देणारे ठिकाण न राहता, त्यांना वैद्यकीय शुश्रूषा, मानसिक आधार, पोषण, स्वच्छता, सुरक्षितता आणि मानवी सन्मान मिळवून देणारे सेवाकेंद्र बनविण्याचा प्रयत्न आहे. अनेक रुग्णांना कुटुंबीयांचा आधार नसतो, तर काही रुग्णांची दीर्घकाळ काळजी घेणे आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे कठीण होते. अशा गरजू रुग्णांसाठी या केंद्राच्या माध्यमातून आधारव्यवस्था निर्माण करण्याचे नियोजन आहे.
कोल्हापूरच्या अनुभवाचा जळगावला लाभ
कोल्हापूर येथील ‘सावली केअर सेंटर’च्या दीर्घ अनुभवाचा उपयोग जळगावमधील प्रस्तावित केंद्राच्या नियोजनासाठी केला जाणार आहे. केंद्राची कार्यपद्धती, कर्मचारी प्रशिक्षण, प्रशासकीय व्यवस्था, रुग्णांच्या गरजा, भोजन व्यवस्था आणि दैनंदिन कामकाजाचे नियोजन यांसारख्या बाबींमध्ये कोल्हापूरच्या केंद्राचे मार्गदर्शन मिळणार आहे.
अनुभवाच्या आधारे जळगावमध्येही गरजू रुग्णांसाठी व्यवस्थित आणि संवेदनशील सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सुरक्षित वातावरणात आवश्यक सेवा मिळाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
दानशूर नागरिकांना जागेसाठी आवाहन
‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर’ सुरू करण्यासाठी सर्वप्रथम योग्य जागेची उपलब्धता महत्त्वाची आहे. त्यासाठी जळगाव शहरातील दानशूर नागरिक, बंगला व इमारत मालक, उद्योगसमूह, सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपला रिकामा बंगला किंवा इमारत किमान तीन वर्षांसाठी सामाजिक सेवेसाठी उपलब्ध करून दिल्यास अनेक गरजू रुग्णांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आधार मिळू शकतो. त्यामुळे केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर जागेच्या स्वरूपातील सहकार्यही या प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
भाडेतत्त्वावरील जागेचाही पर्याय
केंद्रासाठी केवळ देणगी स्वरूपातील जागेची प्रतीक्षा न करता, योग्य बांधकाम असलेली जागा भाडेतत्त्वावर घेण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. अशा जागेसाठी ११ महिन्यांच्या कराराने किंवा अन्य योग्य पद्धतीने भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यामुळे जागा उपलब्ध होण्यातील अडथळे कमी करून केंद्र सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सुरुवातीला २५ लाखांची आर्थिक तरतूद
प्रस्तावित ‘सावली केअर सेंटर’च्या उभारणीसाठी सुरुवातीला सुमारे २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. केंद्राच्या उभारणीसाठी आणि पुढील कामकाजासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, उद्योगसमूह, सीएसआर निधी तसेच वैयक्तिक देणगीदारांच्या माध्यमातून निधी उभारण्याचे नियोजन आहे.
या निधीचा उपयोग केंद्राची आवश्यक व्यवस्था उभारणे आणि रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे. केंद्र दीर्घकाळ सुरळीतपणे सुरू राहावे, यासाठी सातत्यपूर्ण आर्थिक पाठबळ निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.
निधी उभारणीसाठी स्वतंत्र व्यवस्था
या प्रकल्पासाठी निधी उभारणीची स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी स्वतंत्र समिती तसेच आवश्यकतेनुसार सीएसआर आणि निधी उभारणीसाठी स्वतंत्र पथक कार्यरत ठेवण्याचे नियोजन आहे. या कामात रेडक्रॉसचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती आणि उद्योगसमूहांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
निधी उभारणीची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबवून केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘रुग्णसेवा हीच मानवसेवा’
‘रुग्णसेवा हीच मानवसेवा’ या भावनेतून उभारण्यात येणाऱ्या या उपक्रमाला जळगावकरांनी लोकसहभागातून बळ द्यावे, असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजातील निराधार आणि परावलंबी रुग्णांना सुरक्षित निवारा, आवश्यक देखभाल आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. योग्य जागा उपलब्ध करून देणे, आर्थिक मदत करणे किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सहकार्य करणे, अशा विविध स्वरूपांत या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
जळगावमध्ये साकारण्यात येणारे ‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर’ हे गरजू रुग्णांसाठी आधाराचे ठिकाण ठरावे, यासाठी कोल्हापूरच्या केंद्राचे मार्गदर्शन, आणि समाजातील दानशूर व्यक्तींचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.





