पाडळसरे धरणासह गिरणेवरील बलून बंधारे पूर्ण करण्याचा राहील ध्यास- स्मिता वाघ
जळगाव दि.३० : लोकसभेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर तापी नदीवरील अपूर्णावस्थेतील पाडळसरे धरण तसेच गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधारे सर्वप्रथम पूर्ण करण्याचा माझा ध्यास राहील. जेणेकरून अर्ध्याअधिक जळगाव जिल्ह्याची तहान भागून कोरडवाहू शेती बारमाही सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल, असे प्रतिपादन भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी येथे केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे विस्तृत बैठकीचे आयोजन शनिवारी जळगाव शहरातील ब्राम्हण सभेत करण्यात आले होते. त्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्मिता वाघ बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, गोपाळ भंगाळे, रामचंद्र पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी व उपाध्यक्ष मिलिंद चौधरी, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लालचंद पाटील, जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण तसेच कमलाकर रोटे, मनोरमा पाटील, माधुरी अत्तरदे, मनोहर पाटील, संजय भोळे, सुनील नारखेडे, किशोर नारखेडे, आरपीआयचे अनिल अडकमोल आदी उपस्थित होते.
ॲड. हर्षल चौधरी यांनी प्रास्ताविकात विस्तृत बैठकीच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तसेच डॉ.राधेश्याम चौधरी, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, लालचंद पाटील, राजू सोनवणे यांनीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. भाजपाचे तालुका सरचिटणीस गिरीश वराडे यांनी सूत्रसंचालन केले तर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी आभार मानले