लोकमाध्यम न्युज | जळगाव ३१ ऑगस्ट २०२४ |
राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटना सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी तरुणीसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली. यात वृद्धाच्या जागीच मृत्यू झाला.संतप्त नागरिकांनी पूर्ण महामार्ग रास्ता रोको करून जाम केला.
अजबसिंग नारायण पाटील (वय ७८, रा. द्वारका नगर, जळगाव, मूळ रहिवासी ता. यावल) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते द्वारका नगर येथे त्यांची मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत होते. तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील हा त्याच्या परिवारासह गावी यावल तालुक्यात येथे शेतीकाम करण्यासाठी राहत होता. अजबसींग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शनिवारी दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेनंतर ते द्वारका नगर स्टॉपजवळ झाडाखाली असणाऱ्या पारावर बसण्यासाठी गेले होते.
रस्ता ओलांडत असताना जळगाव करून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळेला द्वारका नगरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. घटना आजूबाजूच्या पंचक्रोशीत समजताच सर्व बाजूने नागरिकांनी महामार्गावर येऊन रास्ता रोको सुरू केला.
या वेळेला आमदार राजु मामा भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अनेक जण घटनास्थळी पोहोचले. दरम्यान मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या वेळेला प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बांभोरी रस्त्यावरील जैन इरिगेशन कंपनीपर्यंत तर दुसऱ्या बाजूला शिव कॉलनीपर्यंत महामार्ग ठप्प झाला होता.
धडक देणारी कार ही धडक दिल्यानंतर एरंडोलच्या दिशेने निघून गेली आहे. पोलीस कारचा शोध घेत आहेत.
जिल्हाधिकारी आल्याशिवाय आम्ही रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला त्यामुळे घटनास्थळी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी तहसीलदार शितल राजपूत,पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे , स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड,तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, वाहतूक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, हे आंदोलन करत्यांची समजूत काढली
दोन दिवसांपूर्वी १७ वर्षीय मुलगी आणि ३२ वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी ७८ वर्षीय वृद्धाला कारने चिरडल्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले होते. ११ वाजेपासून दीड वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी ट्राफिक जाम झाली होती . तहसीलदार शितल राजपूत यांनी दोन दिवसात नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.