जयश्रीताईंसाठी एकवटली नारी शक्ती; हुडकोतील कॉर्नर सभेस प्रचंड प्रतिसाद
लोकमाध्यम न्युज | जळगांव ७ नोव्हेंबर २०२४ |
शहरातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. (दि.६) दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत महिलांनी जयश्री महाजन यांना नारीशक्तीचा भक्कम पाठिंबा असल्याचे दर्शवून दिले.
दुपारच्या सत्रात शहरातील प्रभाग क्र. १० मधील खंडेराव नगर, आझानगर या भागातून निघालेल्या प्रचार रॅलीत परिसरातील असंख्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत, जयश्री महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, “जयश्रीताई तुम आगे बढो”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी महिलांनी जयश्री महाजन यांचे स्वागत केले व शहराच्या नेतृत्वाकडून असलेल्या आशा-अपेक्षांचा पाढा जयश्री महाजन यांच्या समोर मांडला. त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधत जयश्री महाजन यांनी त्यांना आपला विकासात्मक दृष्टिकोन सांगितला. प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या तसेच परिसरातील नारीशक्तीने अनेक वर्षानंतर शहराचे नेतृत्व महिलेला देण्याचा निर्धार करत मशाल चिन्हालाच मत देणार असल्याचे वचन यावेळी दिले. नारीशक्तीच्या प्रचंड उपस्थितीने प्रचार रॅलीचे स्वरुपच बदलवून टाकले.
सायंकाळी हुडको भागात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे महानगर प्रमुख अल्पसंख्याक आघाडी जाकीर पठाण यांनी जयश्री महाजन यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर सभेत जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. सभेत त्यांनी महाविकास आघाडीच्या विकासात्मक दृष्टिकोनाबद्दल सांगितले आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर असल्याचे उपस्थितांना आश्वस्थ केले. या सभेला महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.