गोंदेगावकर कुळकर्णी परिवाराच्या कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी ची चक्रपूजा संपन्न

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव १५ फेब्रुवारी २०२५ |
पहूर आणी शेंदुर्णी च्या मध्ये असलेले जामनेर तालुक्यातील 2000 लोकवस्ती असलेले छोटेसे गाव गोंदेगांव. येथे कुळकर्णी गोंदेगावकर परिवारा मधील सर्व भाऊबंद एकोप्याने रहातात. बऱ्यापैकी शिक्षण व नौकरीच्या निमित्ताने बाहेरगावी व बाहेर देशात सुद्धा गेले आहेत. एकवर्षा आड येणाऱ्या माघातील पौर्णिमेला देवीच्या चक्रपूजेच्या कार्यक्रमासाठी सर्वजण एकत्र जमतात . 3 दिवस चक्रपूजेचा हा कार्यक्रम मोठ्या धार्मिक वातावरणात व उत्साहात साजरा करतात.
पहिल्या दिवशी सकाळ पासूनच पूजेची तयारी असते. सुरवातीला संकल्प सोडून पूजेला सुरवात केली जाते, धान्याने ,फळं व फुलांनी देवीचे चक्र सजविले जाते. ब्वा ,वऱ्हाडी ,( कणिकेचे दिवे) ठेवून देवीचा जयघोष करीत ज्योत पेटविली जाते. नंतर सवाष्ण , कुमारिका, मुंजा ह्यांची पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून समुद्रात ( छोटे हात धुण्यासाठी खोदलेले खड्डे त्याला समुद्र म्हटले जाते ) हात धुतले जातात. त्यादिवशी गाणे व भजन म्हणून तसेच उखाणे घेऊन जागरण केले जाते. दुसऱ्या दिवशी ब्वा ,वऱ्हाडीचा व तिसऱ्या दिवशी मोती च्या प्रसादाने सांगता केली जाते. जवळच असलेल्या मळ्यातील देवीचे दर्शन सुद्धा घेतले जाते. सुनील व मीना कुलकर्णी, , योगेश व अपर्णा कुलकर्णी ह्या दापत्यांच्या हस्ते पूजाविधी करण्यात आला. विशेष म्हणजे तरुणपिढी सुद्धा आनंदाने सर्व कार्यात सहभागी होतात. सर्व गोंदेगावकर कुळकर्णी परिवाराच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय धार्मिक व उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळी मुंबई, बडोदा, पुणे, औरंगाबाद, नगर, जालना, नाशिक, जळगाव,भुसावळ, येथील नातेवाईक कार्यक्रमाला उपस्थित होते
संकलन
सौ स्वाती कुळकर्णी, गोंदेगांवकर